अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा नानाविध रुपांसाठी फरहान अख्तर प्रसिध्द असला तरी संगीत हे त्याचे वेड आहे. गाणी लिहिणे, त्यांना संगीत देणे आणि जाहीर कार्यक्रमांमधून गाणी गाणे ही त्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे. चित्रपटांपासून दूर असला की फरहान केवळ संगीतातच रमतो. अशावेळी प्रसिध्दीमाध्यमांपासूनही दूर रहाणे पसंत करणारा फरहान कित्येकदा गाण्यांसाठी अज्ञातवासात जातो. त्याच्या या संगीतप्रेमाची जादू लोकांना शुक्रवारी रात्री अनुभवायला मिळाली. कोणालाही न सांगता फरहानने वांद्रयातील एका रेस्टॉरन्टमध्ये जाऊन थेट गाण्यांची मैफल रंगवली.
फरहान सध्या ‘रॉक ऑन २’च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. योगायोगाने ‘रॉक ऑन’ हाही चार मित्रांच्या रॉक बँडवर आधारित होता. इतक्या वर्षांनंतर आणि कायदेशीर लढाईनंतर त्याच्या सिक्वलचे चित्रिकरण सुरू झाले आहे. दुर्दैवाने, ‘रॉक ऑन’चा दिग्दर्शक अभिषेक कपूर या चित्रपटापासून वेगळा झाला असला तरी सिक्वलचे चित्रिकरण सध्या शिलाँगमध्ये जोरात सुरू आहे. नुकतेच शिलाँगमधील चित्रिकरण आटपून मुंबईत परतलेल्या फरहानला त्याचे संगीतवेड घरी स्वस्थ बसू देत नव्हते. जगभर संगीताचे जाहीर कार्यक्रम करत फि रणाऱ्या फरहानला गेल्या काही महिन्यांमध्ये अशा कार्यक्र मांसाठी वेळच मिळाला नव्हता. मध्यंतरी, झी टीव्हीच्या ‘आय कॅ न डु दॅट’ या रिअ‍ॅलिटी शोचे चित्रिकरण आणि त्यानंतर थेट ‘रॉक ऑन २’च्या चित्रिकरणासाठी झालेली शिलाँगवारी यामुळे बरेच दिवस लोकांसमोर गिटारवर गाणी वाजवण्याचा आणि गाण्याचा आनंद त्याला घेता आला नव्हता. ती इच्छा त्याने शुक्रवारी अचानक एका प्रसिध्द रेस्टॉरन्टला अचानक भेट देऊन पूर्ण केली.
फरहानची ही इच्छा के वळ रेस्टॉरन्टचे मालक आणि कर्मचारी यांनाच माहिती होती. फरहान अचानक येऊन गाण्यांचा कार्यक्रम करणार हे तिथे बसलेल्या लोकांच्या गावीही नव्हते. मात्र मध्यरात्री जेव्हा फरहानने आपल्या बँडसह रेस्टॉरन्टमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. फरहानने लगेचच गिटारवर पकड घेत गाणे-बजावणे सुरु केले. त्याने ‘रॉक ऑन’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या त्याच्या चित्रपटातील गाणी सादर केली. त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय गायकांची गाजलेली गाणीही त्याने सादर केली. अचानक मिळालेल्या फरहानच्या या संगीतमय भेटीवर तिथे जमलेले त्याचे चाहतेही खूश झाले होते. त्याच आनंदात त्यांनी फरहानला पुन्हा पुन्हा गाणयाचा आग्रह केला आणि फरहाननेही त्यांची इच्छा पूर्ण केली. फरहानला गाण्याचे प्रचंड वेड आहे. जाहीर कार्यक्रमांमधून गाणी गाताना त्याला स्वत:ला एक नवी उर्जा मिळते. त्यामुळे चित्रपटांपेक्षाही लोकांसमोर गाण्यांचे कार्यक्रम करायला त्याला आवडतात. शुक्रवारची रात्र ही त्या रेस्टॉरन्टमध्ये जमलेल्या लोकांसाठी जरी विलक्षण भेट होती, मात्र फरहानसाठी हा आनंदाचा अनुभव होता, असे त्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले.