बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने त्याचे नाव बदलून ‘किशन मोहन गिरहोत्रा’ असे ठेवले की काय? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. पण, असं काहीही नाहीये. तर आगामी ‘लखनऊ सेंट्रल’ या चित्रपटात फरहान हा किशन मोहन गिरहोत्रा ही भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच फरहानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘लखनऊ सेंट्रल’चा फर्स्ट लूक शेअर केला असून, या फोटोत त्याने हातात एक पाटी पकडलेली दिसते.

‘लखनऊ सेंट्रल’चा फर्स्ट लूक शेअर करताना फरहानने लिहिलंय की, ‘हा आहे किशन मोहन गिरहोत्रा, तुरुंगात याला १८२१ असे म्हटले जाते. या चित्रपटात डायना पेन्टी, दीपक डोबरियाल, रोनित रॉय आणि पंजाबी अभिनेता, गायक गिप्पी ग्रेवाल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती निखिल अडवाणीने केली असून दिग्दर्शन रंजीत तिवारीचे आहे. हा एक विनोदी चित्रपट असून याची कथा परिस्थितीमुळे तुरुंगात जावं लागलेल्या तरुणाभोवती फिरते. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण लखनऊ येथील तुरुंगात करण्यात आलेय. या चित्रपटासाठी सुरुवातीला क्रिती सनॉनला विचारण्यात आले होते. मात्र, तिच्याकडे तारखा नसल्याने डायनाची यात वर्णी लागली. फरहान आणि डायनाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

वाचा : मी चौकटचा नाही बदामचा राजा- अशोक सराफ

दरम्यान, फरहानचा हा फर्स्ट लूक आणखी एका आगामी चित्रपटाची आठवण करून देतो. अभिनेता अर्जुन रामपालच्या ‘डॅडी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूकही असाच होता. ‘डॅडी’ हा चित्रपट कुख्यात गुंड अरुण गवळी याच्यावर आधारित आहे. तसेच, फरहानच्या ‘लखनऊ सेंट्रल’ ची कथा काहिशी यशराज फिल्म्सच्या आगामी कैदी बंद चित्रपटासारखीच असल्याचे म्हटले जातेय. या चित्रपटातून अभिनेत्री आन्या सिंग आणि रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदार जैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.