फॅशन, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सौंदर्याची परिभाषा बदलणारी एक मॉडेल सध्या बरीच चर्चेत आहे. तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावरही अनेकांनाच घायाळ केलं आहे. अशा या सौंदर्यवतीचं नाव आहे, अलेक्झांड्रा कुतास. ती मुळची युक्रेनची आहे. २३ वर्षीय अलेक्झांड्राला जन्मापासूनच अपंगत्त्व असल्यामुळे ती व्हिलचेअरवरच असते. पण, तिचा आत्मविश्वास मात्र इतरांनाही लाजवेल असा आहे. अलेक्झांड्रा व्हिलचेअरवर असणारी सर्वात पहिली मॉडेल ठरली असून, ती फॅशन जगतातही बरीच चर्चेत असते.

सुडौल बांधा, देखणा चेहरा असे निकष असणाऱ्या मॉडेलिंग विश्वात अलेक्झांड्राचा वावर पाहून अनेकांनाच तिचा हेवा वाटतो. नुकताच तिने दिल्लीतील एका मॉडेलिंग एजन्सीसोबत करार केला आहे. आयुष्यात कधीही जमिनीवर पाय ठेवून न चाललेल्या अलेक्झांड्राने चालण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे चालण्याचा अनुभव घेण्याची तिची फार इच्छा आहे. तिचा आत्मविश्वास आणि कॅमेऱ्यासमोर पोझ देतानाची अदा या साऱ्या गोष्टी खरंच खूप प्रेरणादायी आहेत.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण..

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘इंडियन रनवे वीक २०१७’ मध्ये अलेक्झांड्रा सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्यावरच उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या. आजवर विविध वाहिन्या, वृत्तपत्र आणि वेबसाइट्सवर अलेक्झांड्राच्या मुलाखतीही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

जन्मत:च अपंगत्त्व असल्यामुळे अलेक्झांड्रा व्हिलचेअरवर आहे. ‘स्पाईनल कॉर्ड इंजरी’ असल्यामुळे तिच्या कमरेखालचा भाग लकवाग्रस्त आहे. तरीही शारीरिक अडचणींवरही मात करत अलेक्झांड्रा मोठ्या आत्मविश्वासाने या क्षेत्रात वावरतेय. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी अशा क्षेत्रांमध्येही करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि समाजाच्या दृष्टीकोनात बदल करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.