हिंदी चित्रपटसृष्टीत ‘१०० कोटींचा क्लब’ ही संज्ञा वापरली की, नेहमी सलमान, शाहरूख, अजय आणि अक्षय यांच्याच नावाची चर्चा होते. मात्र अजय देवगण, अक्षय कुमार यांना मागे टाकणाऱ्या एकाही अभिनेत्रीचे नाव पुढे येत नाही. मात्र या क्लबमधील चित्रपटांच्या नावांवर नजर टाकली असता या क्लबमध्ये सलमानला टक्कर देणारा दुसरा कोणताही अभिनेता नसून दोन अभिनेत्री आहेत, हे स्पष्ट होते. करिना कपूर आणि असीन या दोघींमध्ये सध्या या शंभर कोटींच्या क्लबच्या निमित्ताने जोरदार स्पर्धा सुरू आहे.
‘रेफ्युजी’ चित्रपटाद्वारे पदार्पण केलेल्या करिना कपूरला यशाची चव चाखण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागली नाही. पहिल्या चित्रपटानंतर दुसऱ्याच वर्षी आलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला यश मिळाले आणि करिनाने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. ‘जब वुई मेट’मधील तिचा जिवंत अभिनय प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. शंभर कोटी क्लबमध्ये तिने ‘थ्री इडियट्स’च्या माध्यमातून प्रवेश केला. त्यानंतर पुढील वर्षांत ‘गोलमाल ३’नेही या क्लबमध्ये जागा मिळवली. २०११ हे वर्ष करिनासाठी प्रचंड लाभदायक ठरले. या वर्षी करिनाच्या ‘बॉडीगार्ड’ आणि ‘रा वन’ या दोन चित्रपटांनी शंभर कोटी क्लबमध्ये प्रवेश मिळवला. चित्रपटाच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा विचार केला, तर असीनने या क्लबमध्ये करिनापेक्षा कमी वेळेत चार चित्रपटांची नोंद केली आहे. असीनने २००८ मध्ये ‘गजनी’द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि पहिल्या झटक्यातच ती शंभर कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाली. त्यानंतर २०११ मधील ‘रेडी’ने शंभर कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला. तर २०१२ मध्ये  ‘हाऊसफुल २’ आणि ‘बोलबच्चन’ या दोन चित्रपटांनी शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले.
या दोन्ही अभिनेत्रींना शंभर कोटींच्या क्लबमध्ये पहिल्यांदा घेऊन जाणाऱ्या चित्रपटांमध्ये आमिर खान होता. त्याचबरोबर या दोघींनीही सलमान खान आणि अजय देवगण यांच्यासह काम केलेले चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, आता या दोघींचे चित्रपट एकाच वेळी प्रसिद्ध होत असून हे दोन्ही चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होतील, असे दोघींनाही वाटत आहे. असीन अक्षय कुमारसह ‘खिलाडी ७८६’ मध्ये आहे, तर करिना कपूर आमीर खानसह ‘तलाश’ या चित्रपटातून समोर येत आहे.
(चित्रपटासमोर कंसात त्या चित्रपटाची कमाई कोटींमध्ये)
करिना                               असीन
थ्री इडियट्स (२०२)             गजनी (११४)
गोलमाल ३ (१०७)          रेडी (११३)
बॉडीगार्ड (१४२)            हाऊसफुल २ (११४)
रा वन (११५)            बोलबच्चन (१०२)