केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदावरून शुक्रवारी पहलाज निहलानी यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता निहलानी यांनी त्यांची नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. माझ्या जाण्यानंतर आता सगळ्या सिनेमांमध्ये पॉर्न आणि अश्लील दृश्यच दाखवली जातील, अशा शब्दांत निहलानी यांनी आपले मत व्यक्त केले. एवढच बोलून ते थांबले नाही तर काही निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रगीताचं असं खास व्हर्जन तुम्ही आधी पाहिलं नसेल

सीबीएफसीचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सांगितले की, ‘सेन्सॉरशीप गरजेचं आहे आणि त्याच्याविरोधात जाणं म्हणजे सिनेमाच्या निर्मात्यांना त्यांच्या सिनेमात पॉर्न आणि अश्लिल दृश्य दाखवण्याची सूटच दिली आहे. आपल्या देशाची संस्कृती आणि मुल्य यांची सुरक्षा राखण्यासाठी सेन्सॉरशिप फार महत्त्वाची आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘आपल्या देशात सिनेमॅटोग्राफी अॅक्ट हा भारतीय संस्कृतीला डोळ्यासमोर ठेवून बनवला गेला आहे. सिनेमांचा मोठा प्रभाव लोकांच्या आयुष्यावर होत असतो. तुम्ही सिनेमांमध्ये जेवढी जास्त अश्लिलता दाखवाल तेवढीच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल. स्वच्छ भारताच्या जाहिराती पाहून लोकांनी आता रस्त्यावर थुंकणं सोडलं आहे. लोक जे पाहतात त्याप्रमाणेच वागतात. ही गोष्ट लोकांना का कळत नाही माहित नाही.’

निहलानी यांनी सरकारवर आरोप केला की, ‘सरकारमध्ये असे काही लोक आहेत जे सीबीएफसीचं काम फक्त प्रमाणपत्र देणं असून सेन्सॉरशिप करणे नाही असे सांगत सुटले आहेत.’

पहलाज निहलानी जागी प्रसिद्ध गीतकार आणि अॅडमेकर प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन हिचा समावेश करण्यात आला आहे.