जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी नेहमीच चर्चेत असतात. त्यातही जया बच्चन यांचे प्रसारमाध्यमे आणि छायाचित्रकारांशी फारसे चांगले संबंध नाहीत हे सुद्धा अनेकांना ठाऊकच आहे. मुंबईत नुकतेच पार पडलेल्या ‘मामि फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जया बच्चन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी केलेल्या वक्तव्यामुळे जया बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यावेळी जया बच्चन म्हणाल्या की, ‘एक वेळ अशी होती की, आधीचे चित्रपट दिग्दर्शक कलेला जास्त प्राधान्य द्यायचे. पण, सध्या मात्र फक्त व्यवसायालाच प्राधान्य दिले जात आहे.’

या कार्यक्रमामध्ये जया बच्चन यांनी सध्याच्या दिवसांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांविषयी त्यांची भूमिका मांडली आहे. ‘त्या काळी दिग्दर्शक कलात्मक चित्रपटांना प्राधान्य द्यायचे. पण हल्ली मात्र व्यवयासायालाच महत्त्व दिले जात आहे. आपल्या तोंडावर अक्षरश: गोष्टी फेकल्या जात आहेत. लाज नावाची गोष्टच राहिली नाहिए. आता फक्त ‘बॉक्स ऑफिस कलेक्शन’, १०० करोडांचा चित्रपट, ‘फर्स्ट विकएण्ड कलेक्शन’ याबाबतच चर्चा केली जाते. ही सर्व परिस्थिती माझ्या विचारालपलीकडील आहे’, असे जया बच्चन म्हणाल्या.

हल्लीच्या चित्रपटांमधील कितीसे चेहरे देशाचं प्रतिनिधीत्त्व करतात? असा प्रश्न उपस्थित करत हल्लीच्या चित्रपटांतील पात्रांवर पाश्चिमात्य वारे स्वार आहेत असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. ‘असे का होत आहे हे मला माहित नाही. ते देश जास्त श्रीमंत आहे आणि प्रगत आहेत आशी अनेकांची धारणा आहे. पण, ‘माझ्या मते भारतीय त्यांच्यापेक्षा प्रगतिशील आहेत’. हल्लीचे चित्रपट पाहून मला दु:ख होतं, कुठल्यातरी शांत ठिकाणी निघून जाण्याचे विचार मनात येतात’, असेही जया बच्चन म्हणाल्या.

दरम्यान, मुंबईत पार पडलेल्या ‘मामि फिल्म फेस्टिव्हल’मध्ये विविध कलाकारांनी आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती.