आजच्या घडीला बॉलिवूड दबंग सलमान खानसोबत काम करण्यासाठी प्रत्येक अभिनेत्री उत्सुक असते. त्यामुळे सलमानच्या बाहुपाशात जावे लागल्यामुळे अभिनेत्रीला रडू कोसळेल असे कधीच वाटणार नाही. मात्र सलमानच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याच्यासोबत रोमान्स करणा-या अभिनेत्रीला ढसाढसा रडू आले होते. सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या लोकप्रिय चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी यातील सलमानची नायिका भाग्यश्री हिला चक्क सलमानच्या बाहुपाशात आल्यावर रडू कोसळले होते. भाग्यश्रीला अचानक रडताना पाहून सेटवरील सर्वांनाच आश्चर्य वाटले. खुद्द सलमानने यावेळी तिला माझ्याकडून काही चुकले का? असा प्रश्न विचारला. यावर भाग्यश्रीने मानेने नाही असा इशारा केला.

या चित्रपटातील ‘कबूतर जा जा…’ हे गाणे चित्रीत केल्यानंतर एका दृश्यामध्ये भाग्यश्रीला दिग्दर्शकाने सलमानच्या मिठीत विसावण्यास सांगितले असता चित्रिकरणावेळी हा प्रकार घडला. २०१४ मध्ये एका मुलाखतीमध्ये खुद्द भाग्यश्रीने हा किस्सा सांगितला होता. भाग्यश्री ही जुन्या विचारांच्या घरातून चित्रपटसृष्टीत आली होती. त्यापूर्वी ती कोणत्याही अनोळखी पुरुषाच्या इतकी जवळ गेली नव्हती. त्यामुळे सलमानच्या मिठीत तिला रडू कोसळले. या प्रकारानंतर सेटवरील सर्वांनी तिला शांत केले. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी देखील तिच्या भावना समजून घेत तुला योग्य वाटेल तसा सीन करु असे सांगत तिला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केलेला.

१९८९ साली प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटाने दिग्दर्शकच नव्हे, तर सलमान खान आणि भाग्यश्री हेदेखील एका रात्रीत स्टार झाले होते. या चित्रपटातील गाण्यांसोबत ‘फ्रेंडशिप में नो सॉरी नो थँक्यू’ हा डायलॉग आज देखील त्यांच्या चित्रपटाची आठवण करुन देतो. पदार्पणातील अभिनयाबद्दल नव्या चेहऱ्याला दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील या चित्रपटातील अभिनेत्रीला मिळाला होता. भाग्यश्रीच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल बोलायचे तर काही मराठी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे.