चित्रपट हे दृश्य माध्यम असले तरी आपल्या चित्रपट वेड्या देशात ते संवाद माध्यम म्हणूनच जास्त लोकप्रिय झाले याचा सर्वात मोठा प्रत्यय म्हणजे, ‘क्या डायलॉग मारा यार’ अशी आपल्या आवडत्या हीरोच्या एखाद्या संवादाला पब्लिकने टाळ्या शिट्ट्यानी जबरा प्रतिसाद देणे…

संवादातून चित्रपट समजू शकतो म्हणून तर एखादा अंध अथवा दृष्टीहीन प्रेक्षकही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट ऐकून ‘पाहू’ शकतो. फार पूर्वी मिनर्व्हा मुव्हीटोनच्या सोहराब मोदी अभिनित ‘पुकार’ इत्यादी चित्रपटाना अशा अंध तरी डोळस प्रेक्षकांचाही छान प्रतिसाद लाभे असे जुन्या पिढीतील चित्रपट रसिक सांगत. ते ऐकणेही कुतुहल वाढवणारे ठरे.

येथील छायाचित्र इचलकरंजीतील चित्रपट रसिकाचे आहे. विजय कोंडके निर्मित व दिग्दर्शित ‘माहेरची साडी'(१९९१) या सोशिक नायिकाप्रधान चित्रपटाच्या खणखणीत यशाच्या गोष्टी आजही खूप रंगवून सांगितल्या जातात. त्यात ही अंध चित्रपट रसिकाचीही गोष्ट असते. या चित्रपटाची कीर्ति त्यालाही ज्ञात झाल्यावर त्यालाही हा चित्रपट अनुभवासा वाटला. त्यामुळेच तो चित्रपटगृहावर गेला. अशा प्रेक्षकाला तिकीट कसे बरे द्यायचे हा तसा सामाजिक प्रश्न. पण संवाद ऐकून आपण हा चित्रपट पाहू शकतो, त्याचा आशय लक्षात घेऊन आनंद देखील घेऊ शकतो असा त्यालाच विश्वास असेल तर… तसे झाले म्हणूनच तर हा प्रेक्षक सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणेच ‘माहेरची साडी’ एन्जॉय करु शकला व या क्षणाची खूप मोठी बातमी देखील झाली. अशा वेगळ्या बातम्या चित्रपटाच्या पथ्यावरच पडत असतात तसे ते येथेही होणे अगदीच स्वाभाविक होते आणि ‘माहेरची साडी’ आणखीनच गर्दीत चालू लागला.

माहेरची साडीला अनेक प्रकारचे प्रेक्षक लाभलेत. विशेषत: अलका आठल्येचा ग्रामीण भागात प्रचंड चाहतावर्ग निर्माण झाला. तिला हळदीकूंकू सोहळ्यापासून अनेक कौटुंबिक सामाजिक कार्यक्रमाची आमंत्रणे येणे वाढले. पडद्यावर तिने कमालीची सोशिक नायिका साकारली म्हणून तिला पाहण्यास येणार्‍या गर्दीच्या नजरेत कमालीची सहानुभूती दिसे. वृध्द स्त्रिया तर अलकाला आशीर्वाद देऊ लागल्या, ज्याना शक्य त्या अलकाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत.

चित्रपटाचे यश असे बरेच काही देत असते. मग तो अंध प्रेक्षक असो वा असे प्रेमळ प्रेक्षक असोत. अशा प्रेमाची मोजदाद करूच शकत नाही. एखाद्या चित्रपटाने गल्ला पेटीवर किती छनछनाट केला यापेक्षाही ही कमाई खूपच मोठी.
दिलीप ठाकूर