dilip thakurमोठ्या झाडाच्या सावलीत छोट्या झाडाची वाढ खुंटते म्हणतात. पण याला काही चित्रपट दिग्दर्शक अपवाद होते असेच म्हणायला हवे. रवि चोप्रा अगदी तसाच होता. खरं तर बी. आर. चोप्रासारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकाचा मुलगा म्हणून त्याला आपलीच घरचीच चित्रपट निर्मिती संस्था बी. आर. फिल्म या बॅनरखाली खूप चांगली संधी मिळणार हे अगदी स्वाभाविक होते. पण त्यातही त्याने कधी स्वतंत्रपणे तर कधी पित्यासोबत चांगली कारागिरी केली. पहिलाच चित्रपट ‘जमीर’ (१९७६) अमिताभ बच्चनची क्रेज सुरु झाल्याचा हा काळ. सायरा बानू यात नायिका. त्यात एक विशेष म्हणजे सायराचा पहिला चित्रपट ‘जंगली’ (१९६१) चा हीरो शम्मी कपूर या चित्रपटात तिचा पित्याच्या भूमिकेत होता. चित्रपटाला साधारण यश मिळूनही रवि चोप्राची वाटचाल सुरु झाली हे विशेषच. तुम्हारी कसम, आज की आवाज, कल की आवाज असे काही चित्रपट दिग्दर्शित करत पुढे सरकलेल्या रवि चोप्राच्या कारकीर्दीतील दोन उल्लेखनीय गोष्टी म्हणजे, ‘द बर्निंग ट्रेन’ (१९८३) चित्रपट व ‘रामायण’ (१९९०) मालिका. या मोठ्याच आव्हानात रवि चोप्राला पित्याची साथ होतीच. पण रवि चोप्राचाही ठसा उमटला. ओशिवरातील या निर्मिती संस्थेचा असणारा स्टुडिओ व जुहू येथील मिनी थिएटर याचाही रवि चोप्राने सदुपयोग केला. पित्याच्या दिग्दर्शनातील ‘नया दौर’ (१९५७) हा कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट कालांतराने त्याने रंगात परावर्तीत केला. ( २००९) केलाच. पित्याचे अनेक वर्षांपासूनचे ‘बागबान’ चित्रपट पूर्णतेतही त्याने विशेष पुढाकार घेतला. या सार्‍यातून त्याची स्वतःची ओळख कायम राहिली हे जास्तच कौतुकास्पद!