छायाचित्र पाहताक्षणीच तुम्ही ओळखलय की हे “चलती का नाम गाडी “मधील बाबू समझो इशारे… या धमाल गाण्याचे आहे. महत्त्वाचे म्हणजे १९५८ चा हा चित्रपट असून त्यानंतर रसिकांच्या किमान चार साडेचार पिढ्या ओलांडूनही हे गाणे सहज आपलेसे वाटते व अशोक कुमार; किशोर कुमार व अनुप कुमार हे तीन गांगुली बंधूदेखिल जवळचे वाटतात. अर्थात ही किमया उपग्रह वाहिन्यांमुळे शक्य झाली आणि आजच्या पिढीपर्यंत या चित्रपटातील सुमधूर गाणी पोहोचली. एक लडकी भीगी भागी सी… गाण्यातील मधुबालाही एव्हाना लख्खपणे आठवली असेलच. ( मजरुह यांच्या गीताना सचिन देव बर्मन यांचे संगीत हा महत्त्वाचा संदर्भही सांगायलाच हवी) पण बाबू समझो… गाण्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट दिसतेय… पुन्हा एकदा या फोटोवर नजर टाका. काही दिसतेय? तब्बल अठ्ठावन्न वर्षापूर्वीची मुंबई त्यात थोड्याश्या प्रमाणात का होईना पण दिसतेय. विशेषत: दक्षिण मुंबईचा काही भाग दिसतोय. नीट पाहिल्यावर समजते की रस्त्याचे चित्रीकरण अगोदर करून मग स्टुडिओत पडद्यावर ते देत त्यासमोर गाडीत हे तिघे आहेत. तेव्हाच्या सिनेमा तंत्रानुसार ते आहे. तो काळ प्रामुख्याने स्टुडिओत सेट लावून चित्रीकरण करण्याचा होता. काही असो. पण या गाण्यात त्या काळातील मुंबई दिसते. मोकळे रस्ते; डबल डेकर बस; ट्राम बस; घोडागाडी; कपड्यांची पध्दत… एकूण फिल शांत मुंबई असा येतो. गाण्यात प्रत्यक्ष रस्त्यावर एखादे दृश्य चित्रीत केल्याचेही जाणवते; तेव्हाही या तिघांच्या उचापती पाहून पांगणारे दिसतात. दिग्दर्शक सत्येन बोस यानी ती कसरत छान रंगवलीय.
जुने चित्रपट असेही काही महत्त्वाचे संदर्भ दाखवतात; याकडे अधिक लक्ष ठेवावेसे वाटते ना? त्यात माहितीसह मनोरंजन देखील आहे.

दिलीप ठाकूर