flashback, ajay devgn

प्रत्येक यशस्वी माणसाच्या वाटचालीला अपयशाची लहान-मोठी किनार असतेच. ‘जब तक हैं जाँ’सारख्या आपल्या शेवटच्या प्रेमपटापर्यंत वृत्तीने तारुण्यात असल्यागत वावरणाऱ्या दिग्दर्शक यश चोप्रा यानाही ते चुकले नाही, त्याच त्यांच्या ‘फासले’ या चित्रपटाच्या मुहूर्ताचा हा प्रेमळ क्षण. जुहूच्या आपल्या बंगल्यातच त्यांनी तो मोठ्या उत्साहात साजरा केला हे या प्रसन्न-दिलखुलास छायाचित्रात दिसत आहे. त्यांच्याच ‘त्रिशूल’ द्वारे चंदीगढवरून मुंबईच्या चित्रपटसृष्टीत आलेली पूनम धिल्लाँन, सत्तर-एंशीच्या दशकात आघाडीच्या जवळपास प्रत्येक दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटात हवीशी वाटणारी रेखा एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूस फराह आणि महेन्द्र कपूरचा मुलगा रोहन… कसा मस्त योग जुळून आणला ना? फराह आणि रोहन याना नवखेपण वाटू नये म्हणून इस्माईल श्रॉफ दिग्दर्शित ‘लव्ह ८६’ मध्येही त्याना प्रेमिक रंगवायची संधी यशजीनी दिली. (एखादा दिग्दर्शक किती व्यापक विचार करतो ना?) पण का कोण जाणे यशजीना ‘फासले’त सूरच सापडेना नी १९८५ चा अपयशी चित्रपट ठरला. नवीन चेहऱ्यांवर जरा जास्तच मेहनत घ्यावी लागली त्यातून हे झाले, अशी कुजबूज होती पण यशजीनी फासले पूर्वीही फसलेल्या (आदमी और इन्सान) आणि नंतरही गडबडलेल्या (परंपरा) चित्रपटांचा दोष अन्य कोणावरही टाकला नाही. त्यांच्या चाहत्यांना तरी फासले कुठे हो आठवतोय? ही यशजींची खरी मिळकत म्हणावी.