तुर्कस्तान, इटली, स्पेन, अमेरिका या देशांतील मालिका प्रसारित करणार

काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या मालिका बंद करण्याच्या ‘झी आणि एस्सेल’ समूहाच्या निर्णयामुळे अशा मालिका प्रसारित करणाऱ्या ‘जिंदगी’ वाहिनीचे आयुष्य संपुष्टात येईल, अशी चर्चा होती. मात्र, तसे न करता या वाहिनीवरून तुर्की, स्पॅनिश, इटालियन, लॅटिन अमेरिकी आणि कोरिअन भाषेतील मालिकांचे प्रसारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर एकूणच पाकिस्तानी कलाकार आणि त्यांच्या मालिका देशात सुरू ठेवण्याबद्दल निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानी मालिकांना प्रसिद्धी देणाऱ्या ‘जिंदगी’ वाहिनीवरच्या पाकिस्तानी मालिका बंद करत असल्याचे ‘झी आणि एस्सेल’ समूहाचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र गोयल यांनी ट्विटरवरून जाहीर केले होते. दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात वाहिनीने आपल्या पाच नव्या कार्यक्रमांची घोषणा केली. त्यानिमित्ताने बोलताना ‘जिंदगी’ वाहिनीमुळे पाकिस्तानी मालिका आणि तिथले कलाकार घराघरांत पोहोचले आहेत. त्यामुळे उरी येथील पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी याबद्दल निषेध व्यक्त करावा, ही अपेक्षा होती; पण त्यांनी तसे न केल्याने आपल्याला पाकिस्तानी मालिका बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागत आहे, असे गोयल यांनी स्पष्ट के ले.

पाकिस्तानी मालिका बंद झाल्या तरी वाहिनीवर अन्य देशांच्या मालिका दाखवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. सध्या तुर्की मालिका वाहिनीवर सुरू आहेत. त्यात लॅटिन अमेरिका, इटली, स्पेन आणि कोरिया येथील निवडक कथांच्या मालिकाही लवकरच दाखवण्यात येणार आहेत.

अनुपम खेर यांचा निर्माता म्हणून छोटय़ा पडद्यावर प्रवेश

‘जिंदगी’ वाहिनीने पाच नव्या मालिकांची घोषणा केली आहे ज्यात अभिनेता अनुपम खेर यांच्या ‘अ‍ॅक्टर प्रिपेअर्स’अंतर्गत निर्मिती असलेली ‘ख्वाबों की जमीं पर’ ही मालिका प्राइम टाइमला प्रसारित करण्यात येणार आहे. अनुपम खेर या मालिकेद्वारे पहिल्यांदाच निर्माता म्हणून छोटय़ा पडद्यावर प्रवेश करणार आहेत. याशिवाय, ‘लिटील लॉर्ड’ ही तुर्की मालिका, ‘टीव्ही के उस पार’ ही विनोदी मालिका, ‘अगर तुम साथ हो’ ही गुलशन सचदेवा यांची निर्मिती असलेली मालिका वाहिनीवर दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय, तुर्की मालिका ‘फातेमागुल’ही सुरू राहणार आहे. ‘जिंदगी’ वाहिनीवरच्या मालिका आता हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.