कॉलेजचे दिवस विसरणं कोणालाचं शक्य नसतं. बेभान जगणं आणि आपल्या मनाला हवं ते करण्याची संधी त्या दिवसांमध्ये मिळते. त्याच काळात आपण आयुष्यातील पुढची स्वप्न पाहत असतो. त्यात आई-वडिलांच्या अपेक्षाही येतातच. या सगळ्या गोष्टींवर आधारित आगामी ‘एफयू’ या चित्रपटाचा टीझर आहे.’ सैराट’नंतर अभिनेता आकाश ठोसरचा हा दुसरा चित्रपट असून यातील त्याचा लूक पूर्णपणे वेगळा असल्याचे दिसून येते.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफयू’ चित्रपट तरुणाईला लक्षात घेऊन बनवल्याचे दिसून येते. कॉलेजमधील एका रॉक बॅण्डमध्ये गाणाऱ्या आकाशचा वेस्टर्न लूक यात पाहावयास मिळतो. बोल्ड लूकमधील संस्कृती बालगुडेची झलकही यात दाखविण्यात आलीय.

aakash-thosar

त्याचवेळी सत्या मांजरेकरचीही झलक यात पाहावयास मिळते. रॉक बॅण्डमधला गिटारिस्ट आणि बॉक्सर असे त्याचे दोन लूक यात दाखविण्यात आले आहेत. दरम्यान, सैराटमध्ये मार खाणारा आकाश यात मात्र हॉकीस्टिक घेऊन मारामारीच्या बेतात असल्याचे दिसते. ‘नॉर्मल क्लासेसला पोहोचत नाहीस तू, आज एक्स्ट्रॉ क्लासेससाठी एवढा एक्साइट आहेस’, असं सचिन खेडेकर त्यांच्या मुलाला म्हणजेच आकाशला म्हणतात. यावरूनच कॉलेजमध्ये एक्स्ट्रॉ क्लासेसच्या नावाखाली मजामस्ती करणारी तरुणाई यात पाहायला मिळणार याबद्दल शंका नाही. सचिन खेडेकर, शरद पोंक्षे आणि बोमन इराणी ही तिन्ही कलाकार विविध विचारसरणी असलेल्या पालकांच्या भूमिकेत दिसतात.

satya-manjarekar

‘एफयू फ्रेंडशिप अनलिमिटेड’चा टीझर काहीसा निराशा करणारा देखील आहे. ‘नॉर्मल क्लासेसमध्ये एक्स्ट्रॉ शिकवत नाहीत ना. ते एक्स्ट्रा क्लासेसमध्ये नॉर्मली शिकवतात.’ हा एकमेव संवाद आकाशने संपूर्ण टीझरमध्ये म्हटला असून तोही त्याच्या आवाजात नाहीये. यामध्ये आकाशचा आवाज डब करण्यात आल्याचे लगेच कळून येते. टीझरध्ये संवादांपेक्षा म्युझिकचा अधिकाधिक भरणा करण्यात आल्याने काही प्रमाणात निराशा होते.

सचिन खेडेकर, शरद पोंक्षे, बोमन इराणी, भारती आचरेकर, इषा कोप्पीकर, आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे, सत्या मांजरेकर यांच्या भूमिका असलेला ‘एफयू’ येत्या २ जूनला प्रदर्शित होईल.