कॉम्प्युटर हॅकर्सने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. काही विकृत मनोवृत्तीचे इंटरनेट चोर प्रदर्शनापूर्वीच चित्रपट किंवा मालिका इंटरनेवर लीक करतात. जगभरात सध्या सर्वात जास्त लोकप्रिय असलेली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका देखील हॅकर्सच्या जाळ्यात अडकली आहे. या मालिकेच्या सातव्या सत्राची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. परंतु त्याचे पहिले चार भाग प्रदर्शनापूर्वीच इंटरनेटवर लीक झाल्यामुळे निर्मात्यांना भारी नुकसान सहन करावे लागले. आता उर्वरित भाग देखील लवकरच लीक केले जातील अशी धमकी खुद्द हॅकर्सनेच निर्मात्यांना दिल्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या मालिकेच्या कलाकारांनाच आता वेड लागण्याची पाळी आली आहे. टीव्हीवर ‘एचबीओ’ आणि इंटरनेटवर हॉटस्टारच्या माध्यमातून प्रेक्षक ही मालिका पाहू शकतात. एचबीओचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड प्लेप्लर यांनी यासंदर्भात कायदेशीर तक्रार केली असून त्यांचा संशय मालिकेचे वितरण भागीदार असलेल्या ‘स्टार इंडिया’वर आहे. त्याचप्रमाणे ‘स्टार’चा संशय ‘एचबीओ’वर आहे. कारण काही महिन्यांपूर्वी त्यांचा डेटा सर्वर हॅक करण्यात आला होता. त्यावेळी तब्बल १५० टीबीपेक्षा जास्त माहिती चोरीला गेल्याची कायदेशीर तक्रार त्यांनी केली होती. त्याच दरम्यान ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेचे भाग देखील चोरीला गेल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात हॅकिंग वाढले असून त्याने मोठय़ा प्रमाणावर बडय़ा निर्मात्यांचे नुकसान होते आहे. यासाठी एफबीआयने संगणक तज्ज्ञांची एक खास टीम तयार करून याबाबत उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संगणक तज्ज्ञांच्या मते एखादा चित्रपट किंवा मालिका प्रदर्शनापूर्वीच लीक करण्यासाठी मुळात ती माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते कशी याचा शोध घेणे गरजेचे आहे. यात ती कलाकृती निर्माण करणाऱ्यांपैकीच कोणाचातरी हात असण्याची शक्यता आहे. तसेच हे चोर अद्ययावत तंत्रज्ञान स्वत: विकसित करून चोरी करतात, त्यामुळे त्यांना पकडणे फार कठीण काम आहे. परंतु तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू असून लवकरच यावर काही ठोस उपाययोजना काढण्यात येईल, असे आश्वासन एफबीआयने दिले आहे.