करण जोहर आणि ‘बाहुबली २’ च्या निर्मात्यांकडून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून हैदराबाद पोलिसांनी सहा जणांना अटक केले आहे. असे म्हटले जाते की या सहा आरोपींनी निर्मात्यांना खंडणी दिली नाही तर पायरेटेड कॉपी इंटरनेटवर लीक करण्याची धमकी दिली होती. अटक केलेल्या ६ लोकांपैकी एक बिहार येथील चित्रपटगृहाचा मालक आहे. पोलीस उपायुक्त अविनाश मोहंतीने सांगितले की, या सहा जणांनी बाहुबली सिनेमा इंटरनेटवर लीक न करण्याच्या मोबदल्यात १५ लाख रुपयांची मागणी केली होती.

२९ एप्रिलला दाखल केलेल्या एफआयआरच्या मते, राहुल मेहता नावाच्या एका व्यक्तिने स्वतःला अॅण्टी पायरसी एजंसीची व्यक्ती आहे असं सांगून त्याने सिनेमाच्या निर्मात्यांशी संपर्क करून सिनेमाचे एचडी व्हर्जन त्याच्याकडे असल्याचे राहुलने सांगितले. यापुढे जाऊन राहुलने पुरावा म्हणून सिनेमाची एक छोटी क्लिपही दाखवली. जर हा सिनेमा इंटरनेटवर लीक होऊ नये असे वाटत असेल तर १५ लाख रुपयांची राहुलने मागणीही केली.

सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क तर ठेवलाच पण दुसरीकडे पोलिसांनाही याबद्दल सुचना दिली. यानंतर ११ मे रोजी हैदराबाद येथील जुबली हिल्स परिसरातून मेहताला अटक करण्यात आली. राहुल मेहताला पकडल्यानंतर त्याने जितेंद्र मेहता, तौफीक आणि मोहम्मद या उरलेल्या साथिदारांची माहिती पोलिसांना दिली. पुढील तीन दिवसांमध्ये या साथिदारांना दिल्लीमधून अटक करण्या आली. तर चित्रपटगृहाचा मालक दिवाकर कुमारलाही बिहारमधून अटक करण्यात आली.

‘बाहुबली २’ सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेला हा सिनेमा लवकरच १५०० कोटी रुपयांची कमाई करायला सज्ज झाला आहे. बाहुबली सिनेमाने आमिर खानच्या दंगल, पीके तर सलमान खानच्या सुलतान सिनेमांना कलेक्शनच्याबाबतीत केव्हाच मागे सोडले आहे. या सिनेमात प्रभास, राणा डग्गुबती यांची मुख्य भूमिका असली तरी सत्यराज, रम्या कृष्णन आणि अनुष्का शेट्टी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.