बॉलीवूड फंक्शन असो की मराठी सिनेसृष्टीचा समारंभ, एकदा का एखादा सोहळा म्हटला की, त्यात जेवढे आयोजक नसतात त्याच्या तिप्पट प्रायोजक पाहायची आता आपल्या डोळ्यांना सवय लागलीय. पण मराठी फिल्म इंडस्ट्रीचा ‘हार्टथ्रोब’ गश्मीर महाजनी आपल्या अकॅडमीचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करताना प्रायोजकांचा आधार न घेताच तो स्वत: आयोजित करण्याला प्राधान्य देतो.

गश्मीर महाजनी गेली सतरा वर्ष आपल्या अकॅडमीचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करतोय आणि वर्षागणिक तो कार्यक्रम अधिकाधिक भव्य होत चाललाय. गेली दहा वर्ष तर गश्मीरची अकॅडमी पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आपला कार्यक्रम करत आहे. अशा ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्यावर सेट्स-लाइट्सपासून ते कॉस्च्युम्स पर्यंत अनेक गोष्टींवर खर्च होतात. पण खर्चाची तमा न बाळगता आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी तो आपल्या खिशातून प्रत्येक गोष्टींवर खर्च करतो.

वाचा : VIDEO ‘मुंबईच्या राणी’ने मानले माध्यमांचे आभार

अकॅडमीतल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘गश्मीर आपल्य़ा अकॅडमीतील विद्यार्थ्यांचं वार्षिक कार्यक्रमांअगोदर अक्षरश: पितृत्व स्विकारतो असं म्हटलं तरी चालेल. कार्यक्रमाच्या १५-२० दिवस अगोदरपासून अकॅडमीचे विद्यार्थी गश्मीरच्याच घरी दिवस-रात्र असतात. त्यांचं खाण-पिणं पाहण्यापासून ते त्यांच्या मेकअप-हेअर-एक्सेसरीज-कॉस्च्युम, परफॉर्मन्सेससाठीचे प्रॉप्स असं सगळं गश्मीर एकट्याने पाहतो. त्यामुळे गश्मीरचे या कार्यक्रमावर किमान आठ ते दहा लाख खर्च होतात. बहुधा गश्मीर पहिला स्टार असेल जो स्वत:च्या खिशातून एवढा मोठा खर्च करतोय. पण आपल्या विद्यार्थ्यांना मंच देण्यासाठी तो हे सगळं करतो.’

वाचा : चित्रपटाच्या सेटवरील दुखापतीनंतर कंगना रुग्णालयात दाखल

गश्मीर आपल्या आयोजनाविषयी सांगतो, ‘वर्षातून एक दिवस येणारा हा दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळी असते. काय करू आणि काय नको, असं झालेलं असतं. त्यात जर मी प्रायोजक आणले तर मग कार्यक्रमाला थोडं मार्केटिंगच स्वरूप येईल. त्यात मराठी-बॉलिवूड सेलेब्सना आणण्यावरही मग भर दिला जाईल. मग विद्यार्थ्यांच्या ऐवजी तेच लाइमलाइटमध्ये येतील. विद्यार्थ्यांना स्टार बनवण्यासाठी निर्माण केलेल्या स्टेजवर त्यांचा लाइमलाइट हिरावला जाऊ नये, म्हणून माझ्या खिशाला कितीही जड जात असलं तरीही मी प्रायोजकांशिवाय स्वत: सगळं करण्यावर भर देतो. पैसे नंतरही कमावता येतील. विद्यार्थ्यांच्या आनंदापेक्षा ते निश्चितच मोठे नाहीत.’

यंदा २१ जुलैला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गश्मीरच्या डान्स अकॅडमीचा सतरावा वार्षिक समारंभ होत आहे.