टेलिव्हिजनचा बहुचर्चित ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण त्यापूर्वी शोच्या नवनवीन प्रोमोमधून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न वाहिनीकडून केला जात आहे. ‘बिग बॉस’च्या अकराव्या सिझनचा आणखी एक प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या स्पर्धकाची ओळख प्रेक्षकांना करुन देण्यात आली आहे. हा स्पर्धक आहे अभिनेता गौरव गेरा.

गौरव या प्रोमोमध्ये ‘पिंकी पडोसन’च्या भूमिकेत पाहायला मिळतोय. यंदाच्या सिझनमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी शोमध्ये पाहायला मिळणार असून शोच्या संकल्पनेतही काही बदल करण्यात आले आहेत. ‘पडोसन’ ही नवीन संकल्पना या अकराव्या सिझनमध्ये वापरण्यात आली असून गौरव हा ‘बिग बॉस’चा पहिला ‘पडोसन’ असेल. ‘बिग बॉस’च्या घरातील सर्व गॉसिप तुमच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं गौरव या व्हिडिओमध्ये सांगतोय. खरं तर गॉसिप आणि वादविवाद यासाठीच हा शो जास्त चर्चेत असतो. त्यामुळे या सिझनमध्येही भरभरून या गोष्टी असतील असं म्हणायला हरकत नाही.

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून गौरव प्रसिद्धीच्या झोतात आला. गौरव त्याच्या यूट्यूब चॅनेलमुळेही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्येही त्याने भाग घेतला होता.

वाचा : ‘बिग बींनी ते ट्विट हेतूपूर्वक केलं नव्हतं’

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस’चा अकरावा सिझन १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.