महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्याचा इशारा देण्यात आला आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली. उरी हल्ल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी ही मागणी करत करण जोहरच्या कार्यालयालरही धडक मोर्चा नेला होता. सध्या अनेक कलाकार जम्मू काश्मीर येथील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या बाबत त्यांची मते उघडपणे मांडत आहेत. नुकतेच निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि जुही चावला यांनी या हल्ल्याविषयी निराशा व्यक्त केली होती. एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आता अभिनेता सैफ अली खाननेही या हल्ल्याबाबत आणि पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्याच्या देण्यात आलेल्या इशाऱ्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘चित्रपटसृष्टीचे दरवाजे सर्वांसाठीच खुले आहेत आणि देशाबारेहील कौशल्यासाठी तर आहेतच. पण, याबाबत आता सरकारने काही ठाम निर्णय घ्यावेत. आम्ही कलाकार आहोत. आम्ही प्रेम आणि शांततेला प्राधान्य देतो. पण असे प्रसंग पाहता कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सरकारने निर्णय घेतले पाहिजेत. तसेच, देशात कोणाला काम करु द्यावे आणि कोणाला काम करुन देऊ नये हेसुद्धा सरकारनेच ठरवावे’, असे मत प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब सैफ अली खान याने व्यक्त केले आहे.

वाचा: हात जोडून सांगतो, आम्हाला एकटं सोडा- करण जोहर

तत्पूर्वी हंसल मेहता आणि विक्रम भट्ट यांनी उपरोधिकपणे टिका करत उरी हल्ल्याचा आणि मनसेच्या ‘अल्टीमेटम’चा विरोध केला होता. काश्मीर खोऱ्यातील उरी येथील भारताच्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १९ जवाने शहीद झाले होते. उरीतील हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याचीही माहिती पुढे आली. भारतीय जवानांनीही प्रत्युत्तरात १० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सध्या या हल्ल्याची लष्करी चौकशी सुरू आहे. असे असले तरीही भारतीय जनतेत, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर भारतीय आणि चित्रपटसृष्टीमध्ये या हल्ल्याबाबत सध्या असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.