सेन्सॉर बोर्डामुळे अडचणीत आलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाला ‘फिल्म सर्टिफिकेशन अपिलेट ट्राब्यूनल’ने अखेर दिलासा दिला आहे. ट्राब्यूनलचे अध्यक्ष मनमोहन सरिन यांनी सिनेमाला ‘ए’ प्रमाणपत्र देण्याची शिफारस केली आहे. ट्राब्यूनलने काही सीन कट करण्याची सूचना केली असून याशिवाय दिग्दर्शक त्यांच्या इच्छेनुसारही काही दृश्यांना कात्री लावू शकतात असे त्यांनी म्हटले आहे.
‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’च्या समितीने ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ला ‘ए’ प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. सिनेमात महिलांना चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. तसेच एका विशिष्ट समुदायातल्या महिलांवर हा सिनेमा बनवण्यात आला आहे. त्यामुळे त्या समुदायातील महिलांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे सीबीएफसीचे म्हणणे होते.

[jwplayer Wyrpkqyy]

सीबीएफसीच्या प्रमाणपत्र न देण्याच्या निर्णयाविरोधात सिनेमाची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव आणि निर्माते प्रकाश झा यांनी एफसीएटीकडे अपील केले होते. सीबीएफसीने या सिनेमाला प्रमाणपत्र न देऊन चुकीचे काम केले असे न्या. मनमोहन सरिन यांनी स्पष्ट केले. सिनेमात वापरण्यात आलेली असभ्य भाषा आणि काही दृश्य हा त्या सिनेमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे सिनेमात देहविक्री करणाऱ्यांसाठी ज्या शब्दांचा वापर करण्यात आला त्या शब्दांना म्यूट करण्याचे आदेश ट्राब्यूनलने दिले आहेत.

हा सिनेमा चार महिलांच्या आयुष्याभोवती फिरतो. नित्यनेमांची कामं करून, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक- शाह, अहाना कुमरा आणि प्लाबिता बोरठाकुर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पिरीट ऑफ एशिया अवॉर्ड आणि मुंबई चित्रपट महोत्सवात लैंगिक समानतेसाठी बनलेला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून गौरविण्यात आले होते.

[jwplayer FeIpXYkp]