ज्येष्ठ गीतकार आणि लेखक गुलझार यांनी राजेश खन्ना यांनी आनंद चित्रपटासाठी अतिशय किरकोळ मानधन घेतल्याची आठवण सांगितली आहे. “आनंदची कथा राजेश खन्ना यांना खूप आवडली. त्यामुळेच त्यामुळेच हा चित्रपट यशस्वी होताच राजेश खन्ना यांनी मोठी पार्टी दिली”, अशी आठवण सांगत गुलझार यांनी भूतकाळातील घटनांना उजाळा दिला.

ऋषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या आनंदमध्ये राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या आनंद चित्रपटाच्या संवाद आणि पटकथा लेखनाचे काम गुलझार यांनी केले होते. “मुखर्जी यांना विनोदाचीही उत्तम जाण होती. ऋषीकेश यांना असलेली विनोदाची ही जाण त्यांच्या खुबसूरत, चुपके चुपके आणि इतर चित्रपटांमध्ये पाहायला मिळते,” असे गुलझार यांनी म्हटले आहे.

फिल्म एँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) आयोजित सत्रात गुलझार यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. नवोदित दिग्दर्शकांना अनुभवी दिग्दर्शकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळावी, म्हणून आयएफटीडीएकडून या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्रात गुलझार यांनी त्यांचा चित्रपट प्रवास उलगडला. आर डी बर्मन, संजीव कुमार, विशाल भारद्वाज, ए आर रेहमान आणि आपल्या इतर अनेक मित्रांविषयी गुलझार या सत्रात अतिशय भरभरुन बोलत होते. “हरी भाई (संजीव कुमार) आणि पंचम (बर्मन) या दोन व्यक्तींना माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे”, असे गुलझार म्हणाले.

भारतीय चित्रपट निर्मात्यांवर पाश्चिमात्य चित्रपटांचा प्रभाव असतो का, या प्रश्नाला गुलझार यांनी अतिशय समर्पक उत्तर दिले. “आपला इतिहास फार मोठा आहे. आपली संस्कृती खूप मोठी आहे. त्यामुळे आपल्याला कथानकासाठी इतरांचा आधार घ्यावा लागत नाही. मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत पाश्चिमात्य चित्रपट अतिशय उजवे आहेत”, असे गुलझार यांनी म्हटले आहे