बॉलिवूडचा आघाडीचा गायक सोनू निगमचा आज ४३ वा वाढदिवस. आतापर्यंत अनेक नावाजलेल्या गाण्यांनी सोनुने रसिकांना नेहमीच सुखावले आहे. तन्हाई (दिल चाहता है), साथिया (साथिया), दो पल (वीर झारा), मैं हूं ना (मैं हूं ना), नगाडा (जब वी मेट), कल हो ना हो (कल हो ना हो) यांसारखे अनेक नावाजलेल्या गाण्यांना त्याने आपला आवाज दिला आहे.
‘दिवाना’ या अल्बमनंतर सोनू निगम रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची काही गाजलेली गाणी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सोनू निगमने काही दिवसांपूर्वीच सहा मिनिटांचा त्याचा भिकाऱ्याच्या वेषात रस्त्यावर गाणे गात फिरणारा एक व्हिडिओ व्हायरल केला होता.
‘द रोडसाईड उस्ताद’ असे शीर्षक असणारा हा व्हिडिओ ‘बिईंग इंडियन’ या डिजिटल चॅनलतर्फे तयार करण्यात आला होता. यामध्ये सोनू निगमला एका वयोवृध्द भिकाऱ्याच्या वेशात जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर गाण्यासाठी बसविण्यात आले होते. मेकअप केल्यामुळे सोनू निगम एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीप्रमाणे दिसत होता. त्यामुळे कोणीही त्याला ओळखू शकले नाही. मात्र, अनोळखी वेषातील सोनूने रस्त्यावर गायला सुरूवात केली तेव्हा त्याच्या सूरांनी अनेकांची पावले जागच्याजागी थबकली. या अनुभवाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना सोनूने सांगितले की, ‘मला आणि माझा आवाजाला कोणी ओळखू शकले नाही तरी माझा आवाज सगळ्यांना आवडला ही एक चांगली गोष्ट आहे. जेव्हा हा व्हिडिओ शुट केला तेव्हा माझ्या बरोबर संरक्षक किंवा कोणत्याही प्रकारची टीम नव्हती. तो माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता.”