बॉलिवूडमध्ये पारंपारिक सिनेमा बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक, निर्मात, लेखक आणि वितरक सूरज बडजात्या यांचा आज वाढदिवस. सूरज यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीत सर्वात जास्त कमाई करणारे सिनेमे दिले आहेत. तसेच आपल्या बॅनर अंतर्गत त्यांनी अनेक नवीन चेहरेही सिनेसृष्टीला दिले आहेत. सलमानला प्रेम हे नाव देऊन प्रसिद्ध करणारेही हेच दिग्दर्शक आहेत. सूरज बडजात्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती ते महेश भट्ट यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते.

सूरज बडजात्या यांचा दिग्दर्शक बनण्याचा प्रवास १९८९ मध्ये ‘मैंने प्यार किया’ या सिनेमापासून सुरु झाला. या सिनेमाने फक्त सूरज यांनाच फायदा झाला असे नाही तर, सलमान खान आणि भाग्यश्री हेही एका रात्रीत स्टार झाले होते.

या सिनेमातील भाग्यश्री आणि सलमानची जोडी प्रेक्षकांना आजही तेवढीच पसंत आहे. या सिनेमातले ‘फ्रेंडशिप में नो सॉरी नो थैंक्यू’ यासारखे मैत्रीचे संवाद आजही वापरले जातात. ‘मैंने प्यार किया’ सिनेमाच्या यशानंतर त्यांनी ‘हम आपके हैं कौन’ हा सिनेमा बनवला. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला तरी इतर सिनेमे बघण्यापेक्षा प्रेक्षक हा सिनेमा बघायला प्राधान्य देतात. या सिनेमात दिग्दर्शकाने लग्नात होणाऱ्या विधी आणि परंपरांना एवढे ग्लॅमरस बनवले होते की आजही लग्नसमारंभात या सिनेमातील गाणी वाजवली जातात. या सिनेमानंतर सूरज यांनी ‘हम साथ साथ है’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले. या सिनेमातही सलमानने प्रेम ही व्यक्तिरेखा साकारली होती.

सूरज बडजात्यांनी फक्त सलमानलाच नाही तर शाहिद कपूरलाही प्रेम बनवून हिट केले होते. २००६ मध्ये सूरज यांनी ‘विवाह’ हा सिनेमा दिग्दर्शित तर केलाच होता शिवाय या सिनेमाची निर्मितीही केली होती. या सिनेमात शाहिद कपूरची मुख्य भूमिका होती. यानंतर त्यांनी २०१५ मध्ये ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले. अनेक वर्षांनंतर या सिनेमातून सलमान आणि सूरज ही हिट जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र आली होती. हा सिनेमा २०१५ मधील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला होता.

सूरज यांनी २००३ मध्ये ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ हा सिनेमा बनवला होता. या सिनेमात अभिषेक बच्चन, हृतिक रोशन आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका होती.

सूरज बडजात्यांचे सिनेमे-
१९८९- मैंने प्यार किया
१९९४- हम आपके हैं कौन?
१९९९- हम साथ साथ है
२००३- मैं प्रेम की दिवानी हूं
२००६- विवाह
२००८- एक विवाह ऐसा भी
२०१५- प्रेम रतन धन पायो

dd-2

hrk

salman-3