मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची जादू चालविणारे सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. किंग खान शाहरुखच्या आगामी ‘फॅन’ या चित्रपटातून श्रिया बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. शाहरुखसोबत काम करणे हा तिच्यासाठी खूप छान अनुभव असल्याचे श्रियाचे म्हणणे आहे.
मनिष शर्माचे दिग्दर्शन असलेल्या फॅन चित्रपटात सुपरस्टार आर्यन खन्ना आणि त्याचा चाहता गौरव अशा दुहेरी भूमिकेत शाहरुख दिसणार आहे. आपल्या लेकीला शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने सचिन यांनादेखील खूप आनंद झाला आहे. ते म्हणाले की, मी श्रियासाठी खूप खूश आहे. तिची या चित्रपटात छोटीशीचं भूमिका आहे. शाहरुखचा फॅन दाखवलेल्या गौरवसह (म्हणजेचं शाहरुख) ती दिसेल. तिने हा चित्रपट करण्यापूर्वी मला विचारलं मी चित्रपट करु की नको, त्यावर मी तिला संपूर्ण पाठिंबा दिला. मी तिला म्हणालो होतो, स्वतःला बंधनात अडकवून ठेवू नको. तू ज्यांच्यासोबत काम करशील त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची संधी तुला मिळेल. आणि याकरिता शाहरुखपेक्षा योग्य कोणी असूचं शकत नाही.
श्रिया पिळगावकरने २०१३ मध्ये सचिन पिळगावकर निर्मित ‘एकुलती एक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.