सोशल मिडीयावर काही ना काही विनोदी ट्विट करत वाद ओढावून घेणारे अभिनेता ऋषी कपूर यांनी चक्क आभार प्रदर्शन करणारे ट्विट केले आहे. त्यांनी शाहरुख खान याची पत्नी गौरी हिला ट्विटवरून धन्यवाद म्हटले आहे. ऋषी यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर याच्या घराचे इंटेरियर करण्यासाठी त्यांनी गौरीचे आभार मानले आहेत.

ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की,’ ‘वास्तू’ सुंदर. गौरी खान तू रणबीरच्या घराला खरचं ‘घर’ बनवलं आहेस. खूप सुंदर पद्धतीने सजावट केली आहे. मी आणि नीतू आम्ही दोघंही भारावून गेलो आहोत. धन्यवाद.’ शाहरुखची पत्नी गौरी खान ही व्यवसायाने इंटिरीअर डिझायनर आहे. तिने नुकतेच रणबीरच्या घराचे इंटेरियरचे काम पूर्ण केले. तिचे हे काम ऋषी आणि नीतू यांना आवडले आहे. गौरीने व्यावसायिकदृष्ट्या हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान हिच्यासह भागीदारीत एक्सक्लूसिव इंटेरियर प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केलेली. तसेच, तिने स्वतःचे नवे इंटेरियर स्टोर लाँच केले आहे. या स्टोरचे नाव ‘डिझाइन सेल’ असे आहे.

ऋषी कपूर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटातून काही महिन्यांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकले होते. या चित्रपटात आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. करण जोहरच्या या चित्रपटात ऋषी यांनी सिद्धार्थ आणि फवादच्या आजोबांची भूमिका साकारली होती.