महेंद्रसिंह धोनी याच्यावर तयार झालेला ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा हिंदी चित्रपट मराठीत डब करण्यात येणार आहे. हा चित्रपट मराठीत डब करून प्रदर्शित करण्यास ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ आणि त्या पाठोपाठ ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’ने तीव्र विरोध केला आहे. हिंदीतील चित्रपट मराठीत डब केले जाऊ नयेत, त्यामुळे मराठी चित्रपट धोक्यात येतील, असा आक्षेप यावर घेण्यात येत आहे. साहित्य क्षेत्रातही हिंदी व अन्य भारतीय प्रादेशिक भाषेतील साहित्य मराठीत अनुवादित झालेले आहे. हिंदूीतील मंडळींना आपला हिंदी चित्रपट मराठीत डब करावासा वाटणे ही बाब मराठी चित्रपट आणि संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच आनंदाची आहे. मात्र वरवर आनंदाची वाटली तरी त्यातून मराठी चित्रपटांच्या व्यवसायाला धोका आहे, अशी शंकाही मराठीजनांना सतावू लागल्याने यावरून वाद सुरू झाले आहेत..
भारतात दरवर्षी हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये अनेक चित्रपट तयार होतात. यातील अनेक चित्रपट हे गुणवत्ता, विषय आणि आशयाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. यातील अनेक चित्रपट हे कितीही चांगले असले तरी भाषेचा अडसर असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. विविध राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून जेव्हा हे प्रादेशिक चित्रपट सहभागी होतात तेव्हा ते इंग्रजीत सबटायटल्ससह दाखविले जातात. पण इंग्रजी सबटायटल्स दाखविणे आणि तो चित्रपट पूर्णपणे त्या भाषेत डब करणे यात खूप फरक आहे. इंग्रजी सबटायटल्समुळे चित्रपटाचा विषय समजण्यास मदत होऊ शकते मात्र त्यातील संवाद मात्र कळत नाहीत. पण तोच चित्रपट जर त्या त्या प्रादेशिक भाषेत डब झाला तर प्रेक्षकांना त्याच्या संवादासह चित्रपटाचा आनंद घेता येऊ शकतो आणि विषयही चांगल्या प्रकारे कळण्यास मदत होते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी याने अमाप लौकिक मिळवला. देशभर त्याचे चाहते मोठय़ा संख्येने आहेत. धोनीच्या लौकिकामागचा संघर्ष जो अजूनपर्यंत कोणालाही फारसा माहिती नाही तो या चित्रपटातून पहिल्यांदाच उलगडणार असल्याने हा देशभरातील सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी निर्मात्यांनी चित्रपट मराठी, तमिळ, तेलुगू भाषेत डब करण्याचा निर्णय घेतला. अनेक हिंदी चित्रपट याआधी तमिळ, तेलुगू भाषेत डब होऊन दाखवले गेले आहेत. त्यामुळे त्यांची स्वत:ची इंडस्ट्री असूनही त्यांच्याकडून धोनीच्या चित्रपटाच्या डबिंगला विरोध झाला नाही. मात्र मराठीत यावरून वादाला तोंड फुटले आहे.
हिंदी चित्रपटाच्या मराठी डबिंगला विरोध होण्यामागे काही ठाम कारणं असल्याचा दावा याआधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने केला आहे. तसाच तो महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनेही केलेला आहे. मुळात मराठी प्रेक्षक आवर्जून हिंदी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघतात. किंबहुना हिंदी चित्रपटांचा मुंबईतील जो व्यवसाय आहे त्यात मराठी प्रेक्षकांचा टक्का जास्त आहे. असे असताना हिंदी चित्रपट मराठीत डब करण्याचा अट्टहास का? हा सहजी पडणारा प्रश्न आहे. त्यावर खरे म्हणजे हिंदी चित्रपट मराठीत डब करणे ही प्रेक्षकांची गरज नाही, असं उत्तर येतं. मग ती गरज कोणाची तर हिंदी चित्रपट निर्मात्यांची आहे आणि इथेच वादाचे मूळ दडलेले आहे. याआधी हिंदी चित्रपट मराठीत डब झाले नव्हते का? तर असेही नाही. याआधी हिंदी चित्रपट मराठीत डब झाले होते. त्याहीपेक्षा मराठीतील चांगले चित्रपट हिंदीत डब करून दाखवण्यात आले होते. सलीम अख्तर दिग्दर्शित आणि अशोक गायकवाड निर्मित ‘दूध का कर्ज’ हा चित्रपट हिंदीसह मराठीत डब करून प्रदर्शित करण्यात आला होता. याआधी समीर कक्कड दिग्दर्शित मराठीत तयार झालेला ‘आयना का बायना’ हा मूळ मराठी चित्रपट हिंदीत डब करून दाखविण्यात आला होता. या चित्रपटाचे हिंदीतील सॅटेलाइट हक्क ‘सोनी मॅक्स’ या वाहिनीने विकत घेतले होते. प्रभात चित्रपट कंपनीचा ‘शेजारी’ हिंदीत ‘पडोसी’ नावाने आला होता. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ हा चित्रपटही हिंदीत गेला होता. सध्या हिंदी चित्रपट किंवा हॉलीवूडपटही तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषेत प्रदर्शित करून दाखवले जातात. पण त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला कोणताही धोका निर्माण झालेला नाही किंवा त्यांनी तशी ओरडही केलेली नाही. उलट ते चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचण्यास त्याची मदतच झाली आहे. हॉलीवूड स्टुडिओनी जगभरातील विविध भाषांमधून आपले चित्रपट डब करून दाखवल्याने त्यांचे मार्केट विस्तारले, हे ओळखून डबिंग विरोधात ओरड करण्यापेक्षा मराठी चित्रपटांनीही महाराष्ट्राबाहेर उडी मारणे गरजेचे झाले आहे, असे मत जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे यांनी व्यक्त केले.
हिंदी चित्रपटांच्या मराठी डबिंगला विरोध होण्यामागचे कारण हे त्यांचा धंदा वाढणार, या भीतीत आहे. सध्या मराठी चित्रपटांना हिंदी आणि हॉलीवूडपटांच्या गळेकापू स्पर्धेला सामोरे जातच स्वत:ला सिद्ध करावे लागते आहे. मोठे हिंदी चित्रपट किंवा हॉलीवूडपट प्रदर्शित होणार असतील तर आधीच चित्रपटगृहांमधून मराठी चित्रपटांना कमी शो मिळतात. त्यात हिंदी चित्रपटांच्या नियमित शोबरोबर त्यांच्या डब मराठी चित्रपटांना शो द्यावे लागले तर अन्य मराठी चित्रपटांना शोच मिळणार नाहीत, या पुढच्या विचाराने मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांकडून या डबिंगला विरोध होतो आहे. त्यातही एखादा मूळ चित्रपट दुसऱ्या भाषेत पूर्णपणे नव्याने चित्रीकरण करून तयार करण्यापेक्षा तो डब करणे संबंधितांसाठी केव्हाही तुलनेत कमी खर्चाचे असल्याने आज जे धोनीच्या चित्रपट निर्मात्यांनी केले आहे ते उद्या सर्रास अन्य हिंदीतील निर्माते करतील ही भीतीही डोकावते आहे.

मराठीसाठी अभिमानाची बाब

‘सैराट’ या चित्रपटाने नव्वद कोटींहून अधिक व्यवसाय केल्याने बॉलिवूडसह अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टीचे लक्ष मराठीकडे वळले आहे. ‘सैराट’ चित्रपटही लवकरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये डब केला जाणार आहे. मुळात हिंदीत तयार झालेला एखादा चित्रपट संबंधितांना मराठीत डब करून प्रदर्शित करावासा वाटणे ही मराठीसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. याचा दुसरा अर्थ हिंदीवाल्यांनाही मराठी प्रेक्षक, मराठी चित्रपट आणि त्याची बाजारपेठ याचं महत्त्व आता समजलं आहे. त्यामुळे एक सकारात्मक बाब म्हणून या बदलाकडे पाहणे महत्त्वाचे आहे असाही मतप्रवाह मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांमध्ये आढळून येतो आहे. ‘धोनी’नंतर लगेच हिंदीतील अन्य चित्रपटही मराठीत डब होतील असे नाही आणि समजा ते झाले तर मराठीसाठी ती फायद्याचीच बाब ठरेल. कारण त्यामुळे मराठीतील डबिंग कलाकार, अनुवादक, संवाद लेखक यांना नवीन व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध होईल, नवीन संधी त्यातून मिळतील. भविष्यात हॉलीवूड किंवा परदेशी भाषेतील चित्रपट निर्माते व दिग्दर्शकही त्यांचे त्या त्या भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्यास पुढे येऊ शकतात. त्यामुळे मराठी डबिंग इंडस्ट्रीच्या दृष्टीने ही गोष्ट फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे याला सरसकट विरोध न करता त्यामुळे जे बदल होऊ शकतील, त्याच्या परिणामांचा अधिक सखोलपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मराठीत डब करणे पटले नाही
‘ढोणी’ हा चित्रपट मराठीत डब करण्याचे नेमके प्रयोजन काय ते कळलेले नाही. ते जाणून घेणे आवश्यक आहे. पण मराठी चित्रपटांची ताकद कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असेल तर ते चुकीचे आहे. मराठी प्रेक्षकांना हिंदी चित्रपट पाहायची सवय आहे, त्यामुळे मूळ हिंदीत असलेला व मराठीत डब केलेल्या चित्रपटाला प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतील, ते डबिंग चांगले होईल की नाही ते कळत नाही. एखादी भाषा आपल्याला कळत नाही तेव्हा त्या भाषेतील चित्रपट मराठीत डब केला तर समजू शकते, ते योग्यही आहे. पण हिंदीतील चित्रपट मराठीत डब करणे हे पटलेले नाही.
क्षितिज पटवर्धन, -नाटककार व चित्रपट कथा-पटकथा लेखक

हा प्रश्न व्यक्तिसापेक्ष
हिंदी चित्रपट मराठीत डब करावा की नाही हा व्यक्तिसापेक्ष प्रश्न आहे. त्यावर दुमत असू शकते. पण ‘ढोणी’ हा चित्रपट मराठीत डब करावा, असे जर त्या मंडळींना वाटत असेल तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी ती नक्कीच आनंदाची बाब असून हिंदीवाल्यांनी मराठी प्रेक्षकांची दखल घेतली हे नक्कीच महत्त्वाचे आहे. ‘ढोणी’ मराठीत डब झाल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. मराठी प्रेक्षक हिंदी चित्रपट पाहतोच, त्यामुळे मूळ हिंदी चित्रपट मराठीत डब झाला तर त्याला मराठी प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबतही शंका वाटते. कारण प्रेक्षक तो मूळ हिंदी चित्रपटच पाहायला जाईल. अलीकडे प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या काही मराठी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीची बाजारपेठ मोठी आहे, असे हिंदीतील काही जणांना वाटले असल्यानेही त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. मराठीतील प्रेक्षक सुजाण आहे. चित्रपट चांगला असेल तर तो शंभर टक्के चालेल आणि चांगला नसेल तर चित्रपटाची कितीही प्रसिद्धी केली तरी तो चालणार नाही. ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘मुंबई पुणे मुंबई २’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ हे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले होते. सलमान खानच्या चित्रपटाचे आव्हान असतानाही सुजाण प्रेक्षकांनी चांगल्या चित्रपटालाच प्राधान्य दिले.
सतीश राजवाडे, दिग्दर्शक