काही राजकीय घटनांमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील नागरिकांमध्ये जरी दुरावा वाढला असला तरी सिनेमा आणि कला या गोष्टींनी या देशांना जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय. अनेक पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी येतात. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे आपल्या देशात अनेक चाहते आहेत. शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटातील अभिनेत्री माहिरा खाननेसुद्धा अनेकांची मनं जिंकली आणि आता सबा कमरने ‘हिंदी मिडीयम’ या चित्रपटात भूमिका साकारली. या चित्रपटाच्या कमाईने १०० कोटींचा आकडा पार केला असून प्रेक्षक आणि समिक्षकांनी चित्रपटाची भरभरून स्तुतीदेखील केली.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सबा कमरने भारतीयांविषयी आणि हिंदी चित्रपटांविषयी असलेलं प्रेम व्यक्त केलं. ‘जिथे प्रेम असतं, तिथे थोडी भांडणं पण असतात,’ असं सबा या मुलाखतीत म्हणाली. त्याचप्रमाणे ‘पाकिस्तानमधील लोकांना भारतीय लोक खूप आवडतात. खरंच आम्हाला भारतीय आणि हिंदी चित्रपट खूप आवडतात. माझ्या चित्रपटालाही लोकांनी भरभरून प्रेम दिलंय,’ असंही तिने पुढे म्हटलं.

भारतीय जेवणातील आवडी-निवडींविषयी सबाला विचारले असता ती म्हणाली, ‘जुनी दिल्ली आणि चांदनी चौक येथील हॉटेलमधील जेवण मला खूप आवडलं. दाल मखनी हा तर माझा आवडता पदार्थ आहे. दिल्ली आणि मुंबईतल्या पदार्थांची चव पाकिस्तानमध्ये येत नाही.’

वाचा : .. या मराठी सेलिब्रिटींच्या घरी ‘यंदा कर्तव्य आहे’

खरंतर याआधी पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. सीमेवर असलेल्या तणावामुळे ‘ए दिल है मुश्किल’मधील फवाद आणि ‘रईस’मधील माहिराला विरोध करण्यात आला होता. या घटनेवरही सबाने सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ‘आपण मनामध्ये इतका राग का ठेवतो? भूतकाळातील घटनांमध्ये अडकून न बसता भविष्याचा विचार करायला हवा. मला दिल्लीमध्ये लोकांचं खूप प्रेम मिळालं. कोणीही माझ्यावर राग व्यक्त केला नाही किंवा कोणी काही वाईट बोलले नाहीत. दोन्ही देशांमधील सर्व गोष्टी लवकरच ठीक व्हाव्यात अशी मी अपेक्षा करते,’ असं ती म्हणाली. त्यामुळे दोन्ही देशांमधील कटूता कमी करण्यात आणि आपल्या कलेद्वारे लोकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण करण्यात हे कलाकार खूप महत्त्वाची भूमिका बजावतात असं म्हणायला हरकत नाही.