सांकेतिक खुणांचा प्राध्यापक म्हणून होली ग्रेलचे रहस्य शोधणारा रॉबर्ट लँगडन कुठे आणि आता नरकाच्या वाटेने जाणाऱ्या जगाला वाचवण्यासाठी निघालेला तोच लँगडन कुठे.. जगाला वाचवणं ही फार मोठी अवघड जबाबदारी असते, असे मिश्कीलपणे सांगणाऱ्या हॉलीवुड अभिनेता टॉम हँक्स यांच्याशी आणि त्यांना ‘इन्फर्नो’ म्हणजेच नरकाच्या वाटेने घेऊन जाणाऱ्या दिग्दर्शक रॉन हॉवर्ड यांच्याशी खास संवाद साधण्याची संधी ‘लोकसत्ता’ला मिळाली. इन्फर्नोमध्ये इरफान खानचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यानिमित्ताने, हॉलीवूडपटांमध्ये झालेले बदल, तीन दशकं काम करताना रॉन हॉवर्ड-स्टीव्हन स्पिलबर्गसारख्या दिग्दर्शकांबरोबर जमलेली जोडी आणि इरफानच्या निमित्ताने बॉलीवूड ते भारत अशा अनेक गोष्टींवरच्या टॉमबरोबर झालेल्या गप्पा..

रॉबर्ट लँगडनची व्यक्तिरेखा ‘दा विन्ची कोड’ चित्रपटातून लोकप्रिय ठरली. लँगडनची ही साहसी मालिका पुढे नेताना दिग्दर्शक म्हणून रॉनला नरकाची संकल्पना का घ्यावीशी वाटली हे तोच जाणे, असे गमतीने म्हणणाऱ्या टॉम यांनी ‘दा विन्ची कोड’, ‘एंजल्स अ‍ॅण्ड डेमॉन्स’ हे एका अर्थी इतिहासाच्या खाणाखुणा शोधणारे चित्रपट होते आणि ‘इन्फर्नो’ हा भविष्यकाळाचा वेध घेणारा चित्रपट असल्याचे सांगितले. लँगडन एका रुग्णालयात आहे, त्याची स्मृती निघून गेली आहे, त्याही अवस्थेत त्याच्या डोक्यात काही विशिष्ट खुणा-प्रतिमा घर करून आहेत, दिवसाढवळ्या त्याला पडणारी स्वप्नं या सगळ्याचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात तो आहे. त्याच वेळी नरकाच्या संकल्पनेमागे धावणारी एक व्यक्ती विषारी व्हायरस घेऊन वावरते आहे. त्याला हे जग त्या संकल्पनेप्रमाणे विनाशाच्या वाटेवर न्यायचे आहे. या प्रक्रियेत लँगडनसारख्या प्राध्यापकाचे मानसिक विश्व अंतर्बाह्य़ ढवळून निघते आणि हाच भाग अभिनेता म्हणून अधिक आव्हानात्मक होता, असे टॉम हँक्स यांनी सांगितले.

टॉम हँक्स हे नाव घेतले तरी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या व्यक्तिरेखा नजरेसमोर येतात. मात्र दुर्दैवाने फॉरेस्ट गम्प, फिलाडेल्फिया, कॅप्टन फिलिप्स, सेव्हिंग प्रायव्हेट रियान असे वास्तवदर्शी कथा, मानवी भावभावना यांची मांडणी करणारे चित्रपट पाहायला मिळत नाहीत, असे विचारल्यावर हॉलीवूड सध्या सुपरहिरो आणि सायफायपटांमध्ये अडकलेत हे तेही मान्य करतात. हॉलीवूडमध्ये सध्या जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्या साहाय्याने कॉमिक बुक्समधील कथा आणि त्यातल्या काल्पनिक व्यक्तिरेखा आहेत त्या स्वरूपात रुपेरी पडद्यावर हुबेहूब साकारणे सहज शक्य झाले आहे. लोकांनीही असे भव्यदिव्य चित्रपट कधी पाहिले नव्हते. त्यामुळे काळानुरूप झालेला हा बदल स्वीकारायलाच हवा, त्यामागे अर्थात आर्थिक गणितही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. हॉलीवूडमध्ये सायफायपटांचा आता ट्रेण्ड आहे. सुरुवातीला हॉलीवूडमध्ये रॉमकॉमची लाट होती, त्यानंतर काऊबॉयची हॅट घालून बंदुकीच्या फैरी झाडणारे वेस्टर्नपट आले तेही जुने झाले, सेक्स कॉमेडीची क्रेझ आली होती तीही सरली तसंच हाही ट्रेण्ड जाईल. प्रेक्षक पुन्हा एकदा त्याच वास्तवदर्शी चित्रपटांकडे परततील, कारण शेवटी ज्या तुमच्या भावभावनांना साद घालणाऱ्या कथाच तुमच्याबरोबर कायम राहतात, असे आग्रही मत हँक्स यांनी व्यक्त  केले.

रॉनबद्दलचा आदर दुपटीने वाढला – टॉम हँक्स

रॉन हा स्वत:च्या कामाबद्दल अतिशय आग्रही आणि परफेक्ट असतो. ‘इन्फर्नो’चे चित्रीकरण सुरू झालं तेव्हा आम्ही सलग काही तास चित्रीकरण करत होतो. ४८ तास आम्ही ९७ शॉट्स केले. तो एवढं काय चित्रीकरण करतो आहे हे कळत नव्हतं. त्याला स्वत:ला काय दाखवायचं आहे हे लक्षात आलंय की नाही, अशी शंका वाटत होती. आता जेव्हा इरफानबरोबर मी चित्रपट पाहिला तेव्हा कळलं की, या सगळ्या फुटेजमधून त्याने आमच्याकडून इतकं गहिरं काम काढून घेतलं होतं. ही रॉनची ताकद आहे. एखादी गुंतागुंतीची व्यक्तिरेखा, कथा त्याच ताकदीने आणि त्यातली गुंतागुंत कायम ठेवूनही सहजपणे पडद्यावर आणणे ही त्याची खासियत आहे. रॉनबरोबर मी १९८३ साली पहिला चित्रपट केला ‘स्प्लॅश’. त्या वेळी त्याच्याबद्दल जो आदर वाटायचा त्यापेक्षा किती तरी पटीने तो दुणावला आहे.

‘टॉमचं साधं-सरळ जगणंच त्याच्या भूमिकांमधून प्रतििबबित होतं’

हॉलीवूडमध्ये राहून कुठल्याही वादविवादांपासून दूर राहणारा टॉम हँक्स हा माणूस म्हणूनही तितकाच साधा-सरळ आणि सकारात्मक विचार करणारा आहे. तो अभिनेता म्हणून कोणी नव्हता तेव्हाही इतरांबद्दल कायम त्याच्या मनात आदर होता.  आजही तो त्याच आदराने प्रत्येकाशी बोलतो, भेटतो. कोणाला कुठल्याही कारणासाठी दुखावणं हे त्याच्या तत्त्वातच नाही. त्याच्या स्वभावातली ही ऊर्जा, सकारात्मकता आणि साधं-सरळ जगण्याचं तत्त्वज्ञान त्याच्या भूमिकांमधून प्रतििबबित होते. – रॉन हॉवड

इरफान ग्रेट अभिनेता

इरफान खान हा बॉलीवूडचा ग्रेट अभिनेता आहे हे मी ऐकले आहे. त्याच्याबरोबर काम करायचं आहे हे कळल्यानंतर मला हॉलीवूडच्या शॉन कॉनेरीसारख्या दिग्गजाबरोबर काम करतोय अशीच भावना मनात निर्माण झाली होती. बॉलीवूडमध्ये बिग बी वगरे गोष्टी मला ऐकून माहिती आहेत. पण ज्या पद्धतीने बॉलीवूड इंडस्ट्री म्हणून नावारूपाला आलं आहे ते कौतुकास्पद आहे.

अस्सल भारतीय बहुरंगी संस्कृती

भारताविषयी मी खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत. तिथे जाण्याचा योग कधीच आला नाही. मात्र जे जे तिथे जातात ते इथे परतल्यानंतर तिथल्या आध्यात्मिक शक्तीविषयी, बहुरंगी-ढंगी संस्कृती, कपडे, तिथले खाद्यपदार्थ याविषयी भरभरून बोलतात. इतकी मोठी, वैविध्यपूर्ण लोकसंख्या एवढय़ा कमी जागेत गुण्यागोविंदाने नांदते हे ऐकून नेहमी नवल वाटतं, मात्र त्याचं इंगित हे तिथल्या सामाजिक नीतिमत्तेत आहे. – टॉम हँक्स