कोणताही साधारण पारंपरिक भयपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनापुरते भीतीमूल्य राखून असतो. अंगावर काटा आणणाऱ्या, छातीचे ठोके वाढविणाऱ्या आणि कर्णहवालदील करणाऱ्या घटना-ध्वनींचा माफक मारा ही हल्लीच्या भयसिनेमांची चौकटमर्यादा चित्रकर्ते आणि प्रेक्षक दोघांनीही स्वीकारलेली आहे. त्यामुळे अल्पकालीन भयसोहळा साजरा करण्यापलीकडे आजचे भयपट प्रेक्षकांवर फार काळ अंमल चढवू शकत नाही, ही टीका गेली काही वर्षे सुरू आहे आणि त्याला प्रतिवाद करणारे चित्रपट काही आलेले नाहीत. पण अमेरिकी टीव्ही आणि सिनेमांमध्ये विनोदी भूमिका करणाऱ्या जॉर्डन पील याने दिग्दर्शकीय खुर्चीत बसून तयार केलेला ‘गेट आउट’ हा चित्रपट भयपटांनी बांधून घेतलेल्या चौकटी मोडत त्याच्या प्रेक्षकाला नुसता जखडूनच ठेवत नाही, तर मनोरंजनापलीकडे समाजिक भय स्वरूपाची कल्पक कथेद्वारे जाणीव करून देतो.

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी जर्मनीतून अमेरिकी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर गोऱ्यांचा काळ्यांविषयी असलेल्या तिटकारा, हे या देशाचे एकमेव अवगुणवैशिष्टय़ असल्याचे म्हटले होते. त्यांच्या विधानाच्या पन्नास-सत्तर वर्षांनंतरही काहीअंशी वगळता या अवगुणात बदल झालेला नाही, हे दर्शविणाऱ्या घटना आणि संघर्ष अमेरिकेत थांबलेले नाहीत. शोधपत्रकारितेतून, साहित्यातून, गाण्यांतून आणि चित्रपटासारख्या परिणामकारक माध्यमातून या संघर्षांच्या सूक्ष्मलक्षी बाबी समोर येत असतात.  दिग्दर्शक जॉर्डन पील यांनी आपल्या चित्रपटामध्ये समाजातील भयकारक वास्तवाला थरारकथेची जोड दिली आहे. ही निव्वळ काल्पनिका असली तरी कृष्णवंशीयांबाबत गोऱ्यांच्या मनात असलेल्या आदीम विद्वेशाची आणि शोषणाची सहजवृत्ती त्यात प्रभावीपणे आली आहे.

चित्रपटाला सुरुवात होते ती एका कृष्णवंशीय व्यक्तीच्या अपहरणदृश्यातून. त्यानंतर त्याचे तपशील न देता गोष्ट सुरू राहते ती एका तरुण जोडप्याच्या मनोमीलन सोहळ्यातून. तरुणाचे नाव आहे ख्रिस वॉशिंग्टन (डॅनियल कालुया) आणि तरुणीचे रोझ आर्मिटेज (अ‍ॅलिसन विल्यम्स). एकमेकांवरील प्रेमऊर्जेबाबत दोघांमध्ये समानता असली तरी सामाजिक नजरेतून ख्रिस हा कृष्णवंशीय तर रोझ ही श्वेतवर्णीय. एका निश्चित क्षणी आपल्या पालकांना ख्रिसशी ओळख करून देण्यासाठी रोझ आपल्या भिन्नवंशीय जोडीदाराला घेऊन घराच्या दिशेने निघते. आई-वडिलांना थेट भेटल्यानंतरच या वंशबाह्य़ प्रेमाची कल्पना येणार असल्याचे रोझ स्पष्ट करते. त्यामुळे काहीसा बुजलेला ख्रिस आणखी शांत होत जातो. रोझ म्हणेल त्या गोष्टी निमूटपणे स्वीकारतो. त्यांचा घरापर्यंतचा प्रवास सुकर होत नाही. घरी पोहोचल्यावर वातावरण आणखी वेगळ्या पातळीवर पोहोचते.  महालसदृश आणि इतर जगाशी जाणीवपूर्वक संबंध तोडून टाकलेल्या रोझच्या घरात मानसोपचारतज्ज्ञ आई मिसी (कॅथरिन किनर) आणि डॉक्टर डीन (ब्रॅडली विटफर्ड) यांच्याकडून ख्रिसचे तोंडदेखल स्वागत होते. पण ख्रिस फोटोग्राफर असल्यामुळे भवतालच्या वातावरणामध्ये असाधारणतेच्या खुणा शोधायला लागतो. निव्वळ रोझवरील प्रेमासाठी तो तिच्या घरामध्ये मिळणाऱ्या विचित्र वागणुकीकडे दुर्लक्ष करतो. पण प्रेम किंवा लग्नाच्या बोलणीपलीकडे भलत्याच गोष्टी पुढे सरकू लागतात. आपल्या कृष्णवंशीय हितचिंतक मित्राशी दूरध्वनीवर त्रोटक संवाद हा एकच दुवा त्याचा बाहेरच्या जगाशी राहिलेला असतो. अल्पकाळात तोही निसटून जातो आणि चित्रपट उत्तरे देण्याऐवजी प्रेक्षकांसमोर पुढे काय होणार यासाठीचे नवे प्रश्न निर्माण करतो.

रोझच्या घरामध्ये काम करणारे दोन्ही नोकर हे कृष्णवंशीय असतात. हे दोन्ही नोकर कमालीचे गूढ जगणे जगत असतात. ख्रिस त्यांच्याशी संवाद साधायला जातो पण गूढतेच्या साम्राज्यातून ते काही बाहेर येत नाहीत. थोडय़ाच वेळात त्या भल्यामोठय़ा घरात सोहळा असल्यासारखा अनेक स्त्री-पुरुषांचा राबता होतो आणि प्रेक्षकांचे कोडे वाढायला सुरुवात होते. रोझकडून त्याचे भलतेच स्पष्टीकरण येत असले, तरी आपण एका मोठय़ा चकव्यात सापडल्याचे ख्रिसच्या लक्षात येते. रोझच्या आईने त्याला संमोहनविद्येने अंकित केलेले असते आणि डॉक्टर वडील आणखी वेगळ्या मनसुब्याने ख्रिसचा वापर करून घेण्याच्या तयारीला लागलेले असतात. ख्रिसला आपल्या समोरचा मृत्युसापळा दिसतो, तेव्हा भवतालच्या साऱ्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टींशी लढणे किंवा नांगी टाकून मरणे यापैकी कोणतेच पर्याय त्याच्यासमोर उरत नाहीत.

पुढे काय होणार याची थोडीथोडकीही चुणूक न लागू देता चित्रपट आपले आडाखे सर्वच पातळ्यांवर तोडून टाकतो. एकाच वेळी कृष्णवंशीयांविषयी वाटणारा विद्वेष आणि आपल्या मनात दडलेल्या भयराक्षसाला मारण्यासाठी कृष्णवंशीयांचा वापर करणाऱ्या  इथल्या गोऱ्यांचे दांभिक जग यांचा शोध दिग्दर्शक घेतो. वर्णविज्ञानावर हा चित्रपट भरपूर बोलतो. पात्रांच्या तोंडी वर्णमाहात्म्याचे आणि वर्णभेदाचे महत्त्वपूर्ण तपशील राबवितो. या चित्रपटामध्ये अनेक मिश्रप्रकार दडलेले आहेत. पारंपरिक भयपटांच्या पुढे जाऊन इथली भीती प्रचंड टिकावू असल्याचे जाणवेल. सध्याच्या एकसुमार भयपटांच्या परंपरेतून बाहेर आलेला म्हणून ‘गेट आउट’चे महत्त्व फार आहे. त्या जोडीला त्याची आज सुरू असलेली भयकारक सामाजिक परिस्थिती दाखविण्याची ताकद निव्वळ कौतुकास्पद.