‘जंगल बुक’ची कमाई सर्वाधिक

उन्हाळ्याची दोन महिन्यांची सुट्टी लक्षात घेऊन गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल प्रदर्शित करण्याचा हॉलीवूड निर्मात्यांचा प्रयत्न तुफान यशस्वी ठरला आहे. जंगल बुक, कॅप्टन अमेरिका आणि नुकताच प्रदर्शित झालेला एक्समेन या तीनही हॉलीवूडपटांनी तब्बल २५० कोटींहून अधिक कमाई सुट्टीच्या कालावधीत केली आहे. यात ‘जंगल बुक’ची कमाई सर्वाधिक आहे.

एप्रिल आणि मे महिन्यांत मोठय़ा बॅनरचे हॉलीवूडपट भारतात प्रदर्शित करताना फ्रँचाइजी (सिक्वलपट) प्रदर्शित करण्यावर हॉलीवूड निर्मात्यांचा भर असतो. या वर्षी डिस्नेचा ‘जंगल बुक’ एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला. ‘जंगल बुक’ची हिंदी आवृत्ती बॉलीवूड कलाकारांच्या आवाजात प्रदर्शित करण्यात आली. त्यामुळे हा हॉलीवूडपट प्रदर्शित होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप तिकीटबारीवर गर्दी खेचत आहे. कॅप्टन अमेरिका व एक्समेन यांनीही अनुक्रमे ५८  व १६ कोटींची कमाई केली आहे. हॉलीवूडचे  फ्रँ चाईजी चित्रपट आशयाच्या दृष्टीने दर्जेदारच आहेत. आशय-निर्मितीत दर्जेदार असलेल्या या फ्रँचाईजी चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करण्याच्या सगळ्या क्षमता आहेत हे याआधीही या चित्रपटांनी दाखवून दिले असल्याने हॉलीवूड निर्मात्यांनी यावेळी हे चित्रपट इथे जास्त चित्रपटगृहांमधून प्रदर्शित केले आहेत, अशी माहिती ट्रेड विश्लेषक गिरीश वानखेडे यांनी दिली.

सध्या इंटरनेटमुळे सर्व वयातील प्रेक्षकांना हॉलीवूडचे सुपरहिरो-अ‍ॅनिमेशनट परिचयाचे झाले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे. आताही अमेरिकेत ‘अँग्री बर्ड्स’ हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित झाला. आठवडय़ाभराने हा चित्रपट इथे प्रदर्शित होणार असून त्यालाही लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल.

– गिरीश वानखेडे, ट्रेड विश्लेषक