ऐतिहासिक कथा, व्यक्तिरेखांचा आधार घेऊन काल्पनिक मालिकांची निर्मिती करताना इतिहासातील संदर्भाची अनेकदा मोडतोड होते आणि त्यावरून वाद निर्माण होतात. एकता कपूर निर्मित ‘जोधा अकबर’ ही मालिका असेच वाद अंगावर घेऊन सुरू राहिली आणि लोकप्रियही ठरली. त्यामुळे पुन्हा एकदा ऐतिहासिक मालिके च्या निर्मितीवरच जोर देण्याचा निर्णय घेत एकता कपूरने ‘चंद्र नंदिनी’ ही नवीन मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर आणली आहे. चंद्रगुप्त मौर्य आणि त्याची पत्नी नंदिनी यांची कोणाला माहिती नसलेली कथा या मालिकेतून पडद्यावर आणताना या वेळी इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासनच एकताने दिले आहे.

कौटुंबिक मालिकांमध्ये आलेल्या तोचतोचपणामुळे टेलिव्हिजनवर नवनवीन विषयांवर प्रयोग होत आहेत. एकताची ‘बालाजी टेलीफिल्म्स’ कौटुंबिक नाटय़ असलेल्या मालिकांसाठी प्रसिद्ध आहे, मात्र गेल्या काही वर्षांत निर्माती म्हणून तिने भयकथा, ‘नागीन’सारखी अंधश्रद्धा-प्रथांवर आधारित मालिका असे सातत्याने नवे प्रयोग सुरू ठेवले आहेत. ‘चंद्र नंदिनी’ हा याच प्रयत्नांचा भाग आहे. इतिहासात अनेक कर्तृत्ववान राजे होऊन गेले आणि त्यांच्या कथा प्रामुख्याने लोकांसमोर आल्या आहेत. पण या प्रत्येक राजामागे किंवा त्यांच्या कुटुंबांमध्ये कर्तृत्ववान स्त्रिया होत्या. त्या त्या राजांच्या आयुष्यात त्या स्त्रियांचाही तितकाच मोठा वाटा होता. तरीही त्यांच्या कथा कधी फारशा पुढे आलेल्या नाहीत, अशी खंत एकताने व्यक्त केली. पाटलीपुत्रात जन्मलेला आणि मगध सम्राट बनलेल्या राजा चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांच्याबद्दलचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण चंद्रगुप्ताची पहिली पत्नी नंदिनी हिचे त्याच्या आयुष्यातील स्थानही तितकेच महत्त्वाचे होते ज्याबद्दल कुठे फारसे बोलले गेलेले नाही. ज्या परिस्थितीत चंद्रगुप्त आणि नंदिनी यांचा विवाह झाला तिथपासून त्यांची एक वेगळीच कथा इतिहासात सापडली आणि त्यावर मालिका करण्याचा निर्णय घेतला, असे एकताने स्पष्ट केले.

‘चंद्र नंदिनी’मध्ये चंद्रगुप्त मौर्य, त्याचा पराक्रम, चाणक्यनीती या ऐतिहासिक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे ते लक्षात घेऊनच त्या संदर्भाना कुठेही धक्का न लावता ही मालिका लोकांसमोर येईल, असे तिने सांगितले. या मालिकेत ‘जोधा अकबर’मध्ये अकबराची भूमिका साकारणारा रजत टोकास चंद्रगुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे तर ‘मकडी’, ‘इक्बाल’सारख्या चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून नावलौकिक मिळवलेली श्वेता बसू प्रसाद ही अभिनेत्री नंदिनीच्या भूमिकेतून छोटय़ा पडद्यावर पदार्पण करते आहे. ‘जोधा अकबर’मध्ये अनेकदा ऐतिहासिक संदर्भाची मोडतोड केल्यावरून एकतावर टीका झाली होती. या वेळी मात्र इतिहासातील घटना त्याच पद्धतीने लोकांसमोर येतील, असा दावा तिने केला.