पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा दैनंदिन व्यवहारातून रद्द करण्याचा निर्णय घेऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. पण, अद्यापही बॅंका आणि देशातील इतर दैनंदिन व्यवहारांमध्ये सुसूत्रता आलेली दिसत नाहीये. मोदीजींच्या या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातीलच एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणचे चित्रपटसृष्टी. बॉलिवूडमध्येही पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. काही चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ही सर्व परिस्थिती पाहता आपल्या आगामी ‘दंगल’ या चित्रपटाला नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसू नये अशी आशा अभिनेता आमिर खानने व्यक्त केली आहे.

वाचा: ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये आमिरसोबत दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री

‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पाहता तोपर्यंत सर्व परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशाही मिस्ट परफेक्शनिस्ट आमिर खानने व्यक्त केली आहे. ‘मी आशा करतो की याचा (नोटाबंदीच्या निर्णयाचा) चित्रपटावर काहीही फरक पडणार नाही. माझ्यामते आता हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत आहे. ‘रॉक ऑन २’ या चित्रपटावर त्याचा परिणाम झाला होता. कारण, तो चित्रपट नोटाबंदीच्या निर्णयाच्या तारांबळीच्याच वातावरणात प्रदर्शित झाला होता. पण ‘डिअर जिंदगी’च्या बाबतीत तसे झाल्याचे मला वाटत नाही. त्यामुळे आता मी आशा करतो की, माझ्या चित्रपटावर याचा परिणाम होणार नाही’, असे आमिर म्हणाला. यावेळी बोलताना आमिरने ‘भारत बंद’विषयी त्याची प्रतिक्रिया देण्यापासून मात्र नकार दिला.

नुकतेच आमिरने प्रसारमाध्यमांसाठी ‘दंगल’ चित्रपटाच्या ‘बिहाइंड द सीन्स’ची स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आमिरने ‘दंगल’साठी खूपच मेहनत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. वयाच्या विविध टप्प्यातील महावीर सिंग फोगट साकारण्यासाठी आमिरने चांगलाच घाम गाळला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून फक्त आमिरलाच नव्हे तर प्रेक्षकांनाही फार अपेक्षा आहेत. यावेळी आमिरने त्याच्या व्यायामाविषयी आणि आहाराविषयीही चर्चा केली. एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेतील आमिर त्याच्या मुलींना कुस्तीमधील डावपेच शिकवण्यात यशस्वी होणार का? हे जाणून घेण्यासाठी सध्या अनेकांचेच लक्ष या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे लागून राहिले आहे. आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती तसेच नितेश तिवारी दिग्दर्शित दंगल हा चित्रपट येत्या २३ डिसेंबरला प्रदर्शित होईल.