बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणजे भरपूर साऱ्या रहस्यांची एक पेटी. प्रत्येक कलाकाराविषयीच्या अशा काही गोष्टी आहेत, ज्या सहसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. पण, चित्रपटसृष्टीत विविध कारणांनी दिल्या जाणाऱ्या मुलाखतींमध्ये हे कलाकार मंडळीच आपल्या सहकलाकारांबद्दलच्या काही गोष्टी उघड करतात. अशीच एक गोष्ट, किंबहुना असंच एक गुपित अभिनेता सलमान खानने उघड केले होते. ते गुपित होते, अभिनेता आमिर खान बद्दलचे.

एका मुलाखतीत लोकप्रिय सूत्रसंचालक सिद्धार्थ कनन याच्या प्रश्नाला उत्तर देताना आमिर मिश्किलपणे हसला. कारण तो प्रश्नच तसा होता. सलमान आणि आमिर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. किंबहुना ते एकमेकांना सख्ख्या भावांप्रमाणे वागवतात. याचाच अचूक नेम साधत सिद्धार्थने एक आठवण जागवली. ज्यामध्ये त्याला सलमानने आमिरचे एक गुपित सांगितले होते, की आमिर रिक्षाचे पैसे कधीच देत नाही. याच आठवणीचा आणि सलमानने उघड केलेल्या गुपिताचा आधार घेत सिद्धार्थने आमिरला प्रश्न विचारला, ‘हे खरंच असं आहे का?’ हा प्रश्न विचारला असता, आमिर मिश्किपलणे हसून म्हणाला, ‘मला तो प्रसंग पूर्णपणे आठवत नाही. पण त्यावेळी काहीतरी झाले होते. मला तोच प्रसंग आता आठवत नसण्याचे कारण, मी गोष्टी लगेच विसरतो. पण, मी त्यावेळी रिक्षाचे पैसे न देण्यामागचे कारण होते, की त्यावेळी माझ्याकडे खरेच पैसे नव्हते. मी सहसा पैसे सोबत बाळगत नाही.’

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

आमिर स्वत:सोबत पैस बाळगत नाही, ही बाब कळताच सिद्धार्थही थक्क झाला. त्याने मोठ्या कुतूहलाने आमिरला क्षणार्धातच पुढचा प्रश्न विचारला की, तू पैसे बाळगत नाहीस, तर मग घरात पैशांचा व्यवहार कोणाकडे असतो? या प्रश्नाचे उत्तर देत आमिर म्हणाला, ‘सहसा मी किरणकडे पैसे मागतो, किंवा मग माझ्या मॅनेजरकडे पैसे मागतो. पण, त्या दिवशी नेमका मी एकटा होतो आणि माझ्याकडे पैसेच नव्हते. त्यामुळे मग सलमानलाच त्या रिक्षा चालकाला पैसे द्यावे लागले होते. आमिरने हे उत्तर देताच सिद्धार्थनेही त्याची चांगलीच फिरकी घेतली. कलाकारांच्या आयुष्यात घडलेले हे असे प्रसंग बऱ्याचदा त्यांच्या लक्षातही नसतात. पण, गप्पांच्या ओघात या प्रसंगांच्या आठवणी जाग्या झाल्यावर मात्र वेगळीच वातावरण निर्मिती होते हे खरे.