बॉलिवूड अभिनेता ह्रितिक रोशनच्या मुलाने शालेय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावून रोशन कुटुंबाच्या आनंद द्विगुणीत केला आहे. ह्रतिक रोशनचे पिता आणि चित्रपट निर्माता राकेश रोशन यांनी नातू ‘काबिल’ असल्याचे सांगत रिदानचा पदक स्वीकारतानाचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. राकेश रोशन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नातू ‘काबिल’ असल्याचे सांगत त्यांनी रिदानने कोणत्या खेळ प्रकारात पदक जिंकले याचा देखील उल्लेख केला आहे. रिदानने शालेयस्पर्धेत लांब उडीमध्ये पदक मिळविल्याचे त्यांनी म्हटले आहे. ह्रतिक आणि सुझान यांना रिहान आणि रिधान अशी दोन मुले आहेत. त्यातील रिदान हा सर्वात मोठा आहे.

ह्रतिक रोशन आणि सुझान यांचा घटस्फोट झाला असला तरी ते दोघे चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा हे पाहावयास मिळाले होते. ह्रतिकच्या वाढदिवसात सहभागी होऊन सुझानने वैवाहिक संबंध तुटल्यानंतरही मैत्रीचे नाते कायम असल्याचे दाखवून दिले होते. काही प्रसिद्ध बी टाऊन जोड्यांनी २०१६ मध्ये वैवाहिक नात्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान. दोन वर्षांपूर्वी हृतिक आणि सुझानच्या वैवाहिक नात्यात दुरावा आल्यामुळे या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

अभिनेता ह्रतिक रोशनन बऱ्याचदा आपल्या मुलांसोबत सुट्टीचा आनंद साजरा करताना दिसला आहे. रिहान आणि रिधान या आपल्या मुलांसोबतची छायाचित्र ह्रतिक ट्विटरवर प्रसिद्ध करत असतो. काही दिवसांपूर्वीच रिहान आणि रिधान यांच्यासह ह्रतिक स्वित्झर्लंडला गेला होता.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी ‘काबिल’ चित्रपटाबद्दल बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. आगामी चित्रपटामध्ये हृतिक यामी गौतमीसह स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात आंधळ्याची भूमिकेत असणारा हृतिक आपल्या प्रेयसीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दुश्मनांशी चार हात करताना दिसणार आहे. ४२ वर्षीय हृतिकने बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही अनेक चर्चा रंगल्या. त्यानंतर ‘काबिल’च्या निर्मात्यांनी घोषणा केली होती की, ठरलेल्या तारखेच्या एक दिवसआधी हा चित्रपट प्रदर्शित होईल. म्हणजे येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राकेश रोशनच्या निर्मितीत बनलेल्या या चित्रपटाला शाहरुख खानचा ‘रईस’ चित्रपट टक्कर देणार आहे.