आताचं जग हे व्हॉट्स अप, यु ट्यूब आणि फेसबुकचं झालं आहे. माणूस झोपेतून उठत नाही तोवर त्याच्या हातात पहिला मोबाइल दिसतो. प्रत्येक गोष्ट आता मोबाइलमुळे खूप सहज पद्धतीने आपल्यापर्यंत पोहचते. ट्रेनच्या गर्दीत उभं राहून लाइव्ह मॅचचा आनंद घेता येतो. मालिकांचे भाग चुकले की ते त्या त्या वाहिनीच्या अॅपवर पाहायला मिळतात. जग किती पटापट बदलतं ना? पण, ९० चं दशक काही वेगळं होतं. भलेही तुम्हाला आवडतं असलेली मालिका त्याच वेळेत पाहावी लागायची. आतासारखे मालिकांचे तेव्हा रिपीट टेलिकास्ट नव्हते. पण, त्यातही किती वेगळी मजा होती. तेव्हाच्या मालिका आणि आताच्या मालिकांमध्ये खूप फरक जाणवतो.  आताच्या मालिका रटाळ वाटतात. आजही ९०च्या दशकातील त्या मालिकांचा विषय निघाला की, आपल्या मनात त्या मालिकेची एक ना एक आठवण ताजी होतेच. अशाचं काही मालिका आता तुम्हाला पुन्हाला पाहायला मिळणार आहेत. दूरदर्शन वाहिनीने त्यांच्या काही जुन्या मालिका पुन्हा प्रदर्शित दाखविण्याचे ठरविले आहे.

मालगुडी डेज
ऐंशीच्या दशकात छोट्या पडद्यावर गाजलेली ‘मालगुडी डेज’ ही मालिका आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. प्रसिद्ध लेखक आर.के. नारायण यांच्या कथांवर आधारित, कदाचित आतापर्यंतच्या दूरदर्शनच्या इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध मालिका. म्हणजेच मालगुडी डेज. १९८६ मध्ये ही मालिका पहिल्यांदा दूरदर्शनवर आली. आर.के.नारायण लिखित आणि शंकर नाग दिग्दर्शित ‘मालगुडी डेज’ने त्या काळात समीक्षकांसह सगळ्यांचीच वाहवा मिळवली होती. या मालिकेतील अनेक कथा आजही प्रेक्षकांच्या लख्ख स्मरणात आहेत.  या मालिकेचे मालकीहक्क असणाऱ्या राजश्री या कंपनीने ही संपूर्ण मालिका युट्युबवर टाकण्याचे ठरवले आहे. त्यामुळे रसिकांना पुन्हा एकदा जुन्या काळात जाऊन ‘मालगुडी डेज’चा आनंद लुटता येणार आहे.

वागळे की दुनिया
ही मालिकी आर के लक्ष्मण यांच्या कार्टून सिरीजवर आधारित होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील श्रीनिवास वागळे यांच्या दररोजच्या जीवनातील संघर्षावर ही मालिका होती. अंजन श्रीवास्तव यांनी वागळेच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला होता.

waglemos_022317045543

(छाया सौजन्यः युट्यूब)

याव्यतिरीक्त ‘सर्कस’, ‘हमलोग’, ‘बुनियाद’ या मालिकाही पुन्हा दूरदर्शनवर पाहता येणार आहेत.