चित्रपटसृष्टीला ‘मायानगरी’ असेही संबोधले जाते. एखादी व्यक्ती या मोहमायेच्या जाळात अडकली तर त्याला बाहेर पडणे कठीण असते. मायानगरीत पाय टाकल्यानंतर जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकलात तर तुम्ही खरे कलाकार म्हणून ओळखले जाता. अगदी छोट्या आणि सामान्य भूमिका करूनही अनपेक्षित प्रसिद्धी मिळवणारे कलाकारही याच चित्रपटसृष्टीने जगाला दिले आहेत. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे रिचा चढ्ढा. ‘फुकरे’, ‘मसान’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘सरबजीत’, ‘राम लीला’ यांसारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रिचाने ‘ओय लक्की! लक्की ओय!’ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इतर अभिनेत्रींप्रमाणे केवळ मुख्य भूमिका करण्यावरच लक्ष केंद्रित न करता चित्रपटाच्या कथेला महत्त्व देणाऱ्या रिचाने नुकतीच ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वेबसाइटला मुलाखत दिली.

वाचा : किसिंगच्या सीननंतर इम्रान विद्याला विचारायचा ‘हा’ प्रश्न

अनेकदा इतरांच्या मताप्रमाणे वागल्यामुळे रिचाला काही चित्रपटांना मुकावे लागले. मी अगदी सरळ आणि कोणताही बनाव न करणारी मुलगी असल्याचे सांगत ती म्हणाली, सुरुवातीला मी भाबडी होते. त्यामुळे ‘अमुक चित्रपटातील भूमिका चांगली नाही त्यामुळे तो तू करू नको’, असं काहीही सांगितल्यावर मी चित्रपट नाकारत होते. ‘फुकरे’च्या वेळीही असेच घडले. या चित्रपटातील भूमिका खूप छोटी आहे. त्यामुळे तू त्यात काम करू नकोस, असे मला सांगण्यात आले. पण, नंतर ती एक उत्तम आणि महत्त्वाची भूमिका असल्याचे माझ्या लक्षात आले. त्याचसोबत, मला काम करू नको म्हणून सांगणाऱ्या त्या व्यक्तीची प्रेयसीही त्याच भूमिकेसाठी ऑडिशनला गेल्याचे कळले. असं माझ्यासोबत पाच, सहावेळा घडलंय. हे सगळं इथवरच मर्यादित नाहीये. असे काही अनुभव अभिनेत्रींमुळेसुद्धा येतात.

वाचा : ‘गॉसिपला घाबरू नकोस…’ सैफचा साराला सल्ला

एखाद्या अभिनेत्रीसोबत आपली मैत्री असेल तर आपण त्यांच्यासोबत बाहेर फिरायला, जेवायला किंवा खरेदीला जातो. त्याचवेळी तुम्ही चित्रपटासाठी काय तयारी करत आहात ते त्या जाणून घेतात आणि निर्मात्यांकडे जाऊन धडकतात. ‘मी तिला भेटले, या चित्रपटात काम करण्याची तिची इच्छा नाही’, असे सांगून स्वतः ते काम मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्या इतक्यावरच थांबत नाहीत तर निर्मात्यांसोबत झोपण्याचीही त्यांची तयारी असते. अशा स्त्रियांचा मला प्रचंड राग येतो. यामुळे मला अनेक चित्रपटांना मुकावे लागते.