दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते कमल हसन यांनी बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानबद्दल खोचक टिप्पणी केली आहे. मला सामाजिक जाणीव असल्याचे सिद्ध करण्यासाठी आमिरप्रमाणे ‘सत्यमेव जयते’सारखा कार्यक्रम करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटलंय.

वाचा : कपिल शर्माच्या शोमध्ये सचिनने जाणं टाळलं!

तमिळ ‘बिग बॉस’ शोच्या सूत्रसंचलनाची धुरा कमल हसन यांनी सांभाळली आहे. या शोमधून ते तमिळ टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण करत असून, नुकताच याचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. त्यावेळी, सामाजिक विषयांना अधोरेखित करणारा ‘सत्यमेव जयते’सारखा कार्यक्रम वगळून तुम्ही ‘बिग बॉस’ची निवड का केली? असा प्रश्न माध्यमांनी त्यांना केला. त्यावर कमल म्हणाले की, सत्यमेव जयतेचे सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा मी सामाजिकदृष्ट्या अधिक जबाबदार आहे.

आपल्या या नव्या शोबद्दलही या ‘विश्वरुपम’ अभिनेत्याने भाष्य केले. या शोमुळे मला अधिकाधिक घरांमध्ये पोहचता येईल. हा शो मोठ्या प्रमाणात बघितला जातो. विशेष म्हणजे यावेळी मला चित्रपटाप्रमाणे कोणताही अवतार धारण करावा लागणार नाही. मी जसा आहे अगदी तसाच या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचणार आहे, असे त्यांनी म्हटले. या प्रसिद्ध शोसाठी एक कोटी रुपयांचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. तब्बल १०० दिवसांसाठी १५ सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात राहणार आहेत. २५ जूनपासून सुरु होणाऱ्या या शोमध्ये दर शनिवारी कमल हसन शोचे सूत्रसंचालन करताना दिसतील. लवकरच त्यांचा ‘विश्वरुपम २’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.