‘द कपिल शर्मा’ शो हा सध्या टीआरपीमध्ये पडलाच आहे. पण त्याचबरोबर कार्यक्रम पुढे सुरू राहणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादानंतर कपिलसोबत त्यांच्या शोलादेखील या सगळ्याचा फटका बसलेला दिसतोय. या दोघांमधील वादाने संपूर्ण टेलिव्हिजन जगतात खळबळ माजली आहे. पण, या सगळ्यात कोणाच्या चेहऱ्यावर हसू दिसत असेल अशी व्यक्ती म्हणजे सुनील ग्रोवर. आतापर्यंत या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगणाऱ्या सुनीलने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मद्यधुंद अवस्थेत कपिलने ज्याप्रकारे सुनीलचा अपमान केला त्याने त्याला धक्का तर पोहोचला आहेच. त्याचसोबत या प्रकरणाने सुनील खूप दुखावला गेला आहे. दहा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर सुनील ‘द कपिल शर्मा शो’ला अलविदा करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. मात्र, या सर्व चर्चांपासून त्याने दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्याने नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली असून, मी सध्या खूप निवांत असून, आत्मपरीक्षण करतोय. भविष्यातील माझ्या कामाबद्दल खोल विचार करण्यात मी गुंग आहे. आता जो काही तमाशा सुरु आहे तो मी बघतोय. हे खूपच मनोरंजक आहे, असे त्याने म्हटले आहे.

कपिलने सुनील आणि इतर सहकलाकारांचा अपमान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा त्याने असे केल्याचे सुनीलच्या मित्राने सांगितले. त्यामुळे कपिलसोबत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्यात आता सुनीलला रस नाही. पत्नी आणि मुलासह तो आता एका अज्ञात स्थळी सुटी घालवण्यासाठी गेल्याचेही त्याच्या मित्राने सांगितले.

भारतीय टेलिव्हिजन विश्वातील या आघाडीच्या विनोदवीरांमधील वाद केव्हा संपणार हे सांगणे अशक्य आहे.

sunil-grover-kapil-sharma-759