अभिनेत्री राधिका आपटे ही तिच्या चित्रपटांसोबतच, वक्तव्यांसाठीही नेहमीच चर्चेत असते. ‘फोबिया’, ‘बदलापूर’, ‘मांझी- द माउंटन मॅन’ या चित्रपटांद्वारे आणि ‘अहल्या’ या लघुपटाद्वारे चौकटीपलीकडल्या भूमिकांना न्याय देत अभिनेत्री राधिका आपटेने अनेक समजूतींना शह दिला आहे. हटके भूमिकांसह तिच्या ठाम वक्तव्यांसाठीही राधिका सध्या चाहत्यांच्या मनावर आरुढ आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ‘कशाचीही तमा न बाळगता मी आजवर मला ज्या गोष्टी योग्य वाटल्या, त्याच मी केल्या,’ असे ठाम मत अभिनेत्री राधिका आपटेने मांडले आहे.
काही दिवसांपूर्वी राधिका तिच्या ‘पार्च्ड’ या चित्रपटातील प्रणयदृश्ये सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे चर्चेत आली होती. पण तिच्या म्हणण्यानुसार ही दृश्ये लीक झालीच नाहीत. ‘लॅक्मे फॅशन वीक २०१६’ मध्ये डिझायनर सरोज जलानच्या कलेक्शनला सादर करण्यासाठी राधिका रॅम्पवर उतरली होती. यावेळी तिला तिच्या वक्तव्यावर येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांबाबत विचारले असता तिने आपले मत मांडले. ‘काही न बोलताही अनेकदा तुम्हाला काही नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोच. त्यामुळे इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना घाबरण्याचे कारणच नाही. कोणत्याही बाबतीत माझे दुमत नसते त्यामुळे मी मला जे योग्य वाटते तेच करते’, अशी ठाम भूमिका राधिकाने मांडली.
राधिकाच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत तिने व्यावसायिक आणि काही वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या असल्या तरीही तिला हवेतसे यश मिळालेले नाही असे काहीजणांचे मत आहे. असे असले तरीही ‘मला अभिनेत्री म्हणून मला आणखी बरेच शिकायचे आहे. ही तर फक्त सुरुवातच आहे’, असेही राधिका म्हणाली. तिच्या ‘पार्च्ड’ या चित्रपटातील लीक झालेल्या दृश्यांविषयी बोलताना ‘ती दृश्ये लीक झाली नसून विविध देशांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यामुळे अशा चित्रपटांच्या बाबतीत तुर्तास समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असेही राधिकाने सांगितले.