राखी सावंत आणि वाद हे जणू समीकरणच झाले आहे. आपल्या बोल्ड शैलीसाठी प्रसिध्द असणारी राखी वादग्रस्त विधाने करून सतत चर्चेत असते. आपण शस्त्रक्रियेद्वारे स्तनांना उभार दिल्याचे तिने अलीकडेच सार्वजनिकरित्या कबूल केले असून, त्यात विशेष ते काय असा प्रश्नदेखील तिने विचारला आहे. जर आपल्या बॉलिवूडकरांच्या शरीरात गेलेले प्लास्टिक जमा करण्यास सुरुवात केले, तर या इमारतीखाली तीन ट्रक प्लॅस्टिक भरेल. निदान मी प्रामाणिकपणे कबूल तरी करते, असे तिने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. दरम्यान, तिने घातलेल्या मोदी ड्रेसमुळे काही दिवसांपूर्वी ती चर्चेत आली होती. काहीही करुन माध्यमांचे लक्ष स्वतःकडे ओढून घेण्यात तरबेज असलेल्या राखीने एक पाऊल पुढेच टाकत फेडरेशन ऑफ इंडियन अमेरिकन्स यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ने असा ड्रेस परिधान केला होता ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. अनेक ठिकाणी मोदींचे छायाचित्र प्रिंट केलेला काळ्या रंगाच्या ड्रेसवर तिने घातला होता. केवळ हा ड्रेस परिधान करून ती स्वस्थ बसली नाही तर सोशल मीडियावर या ड्रेसमधला स्वत:चा फोटोदेखील शेअर केला होता. राखीने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले होते. हे फोटो इंटरनेटवर येताच काही तासांमध्ये व्हायरल झाले होते. ट्विटरवरही अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. काहींनी राखीला मोदींची एक नंबरची फॅन बनवले तर काहींच्या मते तो मेड इन इंडियाचा ड्रेस होता. तर अनेकांनी या फोटोवरून राखी सावंतवर टीका केली होती. नंतर, पंतप्रधान आणि भाजप नेत्यांच्या संमतीनेच ड्रेसवर आपण मोदींचे फोटो प्रिंट केल्याचा दावा राखीने केला होता.

याआधीही प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर राखीने सिलिंग फॅनवर बंदी आणण्याची मागणी केली होती. तिच्या मते, सिलिंग फॅनमुळेच जास्तीत जास्त आत्महत्या होत असतात. त्यामुळे अशा फॅनवर लवकरात लवकर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी तिने केली होती. आयटम गर्ल प्रतिमेला छेद देण्याच्या प्रयत्नात असलेल्या राखीने ‘एक कहानी ज्युली की’ चित्रपट स्वीकारला असून, चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसेल. या चित्रपटाविषयी बोलताना, एक अभिनेत्री म्हणून साचेबद्धतेमध्ये न अडकता मला प्रयोगशील व्हायला आवडते. चित्रपटातील माझी भूमिका कणखर आणि अर्थपूर्ण असून, त्याला विविध पदर आहेत. अशा प्रकारची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. प्रथमच माझ्यातील प्रतिभेला आव्हान देत मी अशा प्रकारची भूमिका साकारत आहे, फार कमी अभिनेत्रींनी अशा प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ही भूमिका माझ्या वाट्याला येणे हे मी माझे भाग्य समजते. क्षणाचाही विचार न करता मी होकार दिला. माझ्या प्रयत्नांना सिनेरसिक आणि चित्रपटसृष्टी कसा प्रतिसाद देते ते पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केली होती.