गेल्या काही दिवसात राष्ट्रगीत हा केवळ आपल्या राष्ट्राचे प्रतीक उरला नसून राजकीय वादाचे हत्यार बनला आहे. हेच हत्यार पुन्हा एकदा उपसून अनुपम खेर यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर वार केला आहे.

मला राहुल गांधी यांच्या भारतीयत्वावर शंका घ्यायची नाही परंतु, मला एकदा त्यांना राष्ट्रगीत म्हणताना पाहायचे आहे. त्यांना राष्ट्रगीताचे बोल येतात की नाही हे मला पाहायचे आहे असा खोचक टोला ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राहुल यांच्यावर लगावला आहे.

वडोदरा येथे आयोजित वीसीसीआय एक्सपोमध्ये ते बोलत होते. राहुल गांधी यांच्यावर त्यांनी वेळोवेळी तोंडसुख घेतले आहे. असहिष्णुतेच्या मुद्दावर देखील राहुल यांना त्यांनी फैलावर घेतले होते.

चित्रपट सुरू होण्यापुर्वी राष्ट्रगीताचे गायन व्हायला पाहिजे असा निर्णय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीका देखील केली होती. त्यावरुनच राहुल गांधी यांचा मुद्दा निघाला आणि अनुपम खेर यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

या व्यतिरिक्त अनुपम खेर हे नोटाबंदीच्या मुद्दावर देखील बोलले. सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण होता असे ते म्हणाले. या निर्णयामुळे भारतातील भ्रष्टाचाराला आळा बसेल असे ते म्हणाले.

हा निर्णय गुप्त ठेवणे अत्यंत आवश्यक होते त्यामुळे सरकारने सर्वांची संमती का घेतली नाही हा प्रश्न विचारणे गैर ठरते असे ते म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करीत आहे. खेर यांनी त्यांना देखील धारेवर धरले. आता कुठे गेली त्यांची सहिष्णुता असा सवाल देखील त्यांनी केला. पंतप्रधानांच्या निर्णयावर विरोधीपक्ष असहिष्णुतेनी वागत असल्याचे ते म्हणाले.