बॉलीवूड अभिनेता सलमान खान त्याच्या वक्तव्यावरून नेहमीच वाद ओढावून घेतो. सुलतानच्या चित्रीकरणानंतर आपल्याला बलात्कारीत महिलेसारखे वाटत होते, त्याच्या या वक्तव्यावरून बरेच वादविवाद चालू आहेत. काही बॉलीवूडकरांनी सलमानच्या विरुद्ध आपली भूमिका मांडली. तर काहींनी सलमानचा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता, असे म्हणून त्याची पाठराखण केली. आता तर खुद्द सलमाननेच आपले मौन सोडले आहे. मी जे काही बोलतो त्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय. त्यामुळे मी सध्या कमीच बोलायला हवे, असे सलमानने मस्करीत म्हटले.
नुकत्याच झालेल्या आयफा पुरस्कार सोहळ्याच्या उदघाटनावेळी सलमान आनंदात दिसत होता. तेव्हा तो म्हणाला, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कारण सध्या मी कमीच बोलणे योग्य आहे. काही राजकीय पक्ष आणि राष्ट्रीय महिला आयोगाने सलमानने त्याच्या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र, सलमानने अद्याप त्याच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितलेली नाही.
आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी माद्रीदला जाण्यापूर्वी सलमानला प्रसार माध्यमांनी मुंबई विमानतळावर घेरले. तेव्हा तुझ्या वक्तव्याबाबत तू माफी मागणार का? असे विचारले असता सलमानने मंद हास्य देत तेथून काढता पाय घेतला.