मराठी चित्रपट आणि मालिकांद्वारे प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर चालवली आहे. तर ‘लोपामुद्रा’ या आपल्या काव्य संग्रहानेही ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. सध्या स्पृहा जोशी ही उमेश कामतसोबत ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’ हे नाटक केले. तसेच, तिने ‘मोरया’, ‘अ पेइंग घोस्ट’, ‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, या अभिनेत्रीला याआधी कंडक्टर बनण्याची इच्छा होती, हे तुम्हाला माहित आहे का?

काही दिवसांपूर्वीच स्पृहा जोशीचा तिच्या चाहत्यांसह ट्विटरवर ट्विटरकट्टा रंगला होता. तेव्हा तुला बालपणी काय होण्याची इच्छा होती, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आपल्याला बस कंडक्टर होण्याची इच्छा होती असे स्पृहाने सांगितले. विशेष म्हणजे यामागचे तिचे कारण जाणून तुम्हीही हसाल. या प्रश्नाचे उत्तर देताना स्पृहा म्हणाली की, मला बालवयात असताना बस कंडक्टर बनण्याची इच्छा होती. कारण त्यांच्या बॅगेत खूप पैसे असतात. गोंडस , निरागस , स्वप्नाळू की बिनधास्त स्पृहा ? असाही प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर तिने आपण या सगळ्याचे मिक्शचर असल्याचे सांगितले. तसेच, स्पृहाला स्वतःच्या स्वभावातली न आवडणारी गोष्ट म्हणजे तिला माणसं अजिबात ओळखता येत नाहीत. ती लगेच कोणावरही विश्वास ठेवते असे तिचे म्हणणे आहे. आत्ताच्या पिढीतल्या कुठल्या बॉलीवूड हीरो बरोबर तुला काम करायला आवडेल? त्यावर तिने रणबीर कपूर असे उत्तर दिले. असे अनेक प्रश्न स्पृहाला ट्विटरकरांनी विचारले आणि स्पृहानेही त्याच उत्साहाने सर्वांना उत्तरे दिली.