बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर सध्या आगामी ‘रंगून’ सिनेमाच्या प्रमोशमध्ये व्यग्र आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित सिनेमात त्याच्यासह बॉलिवूड क्विंन कंगना रणौत आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कंगना आणि सैफ सोबत पहिल्यांदा एकत्र काम करणाऱ्या शाहिदचा भारद्वाज यांच्यासोबत हा तिसरा सिनेमा आहे. मिशाच्या जन्मानंतर ‘रंगून’ या चित्रपटातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खास असल्याचे तो म्हणाला होता.

रेडीफ डॉट कॉमने प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीत, रंगून आणि पद्मावती या सिनेमांनंतर पुढचा सिनेमा कोणता असेल असा प्रश्न त्याला विचारण्यात आला तेव्हा त्याने मी या दोन सिनेमांनंतर बेकार आहे असे उत्तर दिले. रंगून सिनेमा प्रदर्शासाठी जरी सज्ज झाला असला तरी पद्मावती सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण होणे बाकी आहे. पद्मावतीच्या चित्रिकरणाला साधारणपणे २०० दिवस लागणार आहेत. आतापर्यंत या सिनेमाचे फक्त २५ दिवसाचे चित्रिकरण झाले आहे. अनेक सिनेमांसाठी मला विचारण्यात येत आहे पण पद्मावतीचे चित्रिकरण पूर्ण झाल्याशिवाय मी दुसरा कोणताही सिनेमा घेणार नाही, असे शाहिदने स्पष्ट केले.

दरम्यान, चित्रीकरणावेळीचे अनुभव सांगताना शाहिद म्हणाला होता की, प्रत्येक नवीन सिनेमा हा नवीन आव्हाने घेऊन येत असतो. त्याप्रमाणे हा सिनेमा देखील आव्हानांनी भरलेला असा होता. सिनेमासाठी अरुणाचलमध्ये चित्रीकरण करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. सैफ अली खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना शाहिदने त्याला चांगला आणि कुल अभिनेता असल्याचे प्रशस्तीपत्र दिले. चित्रीकरणानंतर तो एकदम कुल असायचा, असे शाहिदने म्हटले होते. सिनेमाच्या पार्श्वभूमीवर शाहिद आणि कंगना यांच्यात शीतयुद्ध रंगल्याच्या अनेक बातम्या झळकल्या असल्या तरी कंगनासोबतचे व्यावसायिक संबंध उत्तम असल्याचे तो म्हणाला होता.

सैफ अली खान याने याआधी विशाल भारद्वाजसोबत ‘ओमकारा’ सिनेमात काम केले होते. तर अभिनेत्री कंगना रणौत यात मिस जुलियाची भूमिका साकारत आहे. शाहिद कपूर, सैफ अली खान आणि कंगना रणौत अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘रंगून’ येत्या २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.