बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आगामी ‘बार बार देखो’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. चित्रपटाच्या गाण्यांसोबतच त्याच्या ट्रेलरमुळेही रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लग्नापेक्षा जास्त करिअरला महत्त्व देणाऱ्या एका तरुणाचे पात्र साकारत आहे. त्याच अनुशंगाने कतरिना कैफने केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या चित्रपट वर्तुळात एकच चर्चा रंगत आहे.
एका मुलाखती दरम्यान ‘तुझं प्रेम असणाऱ्या कोणा एका व्यक्तिसाठी तू तुझं करिअर सोडशील का?’ असा प्रश्न कतरिनाला विचारला असता एका क्षणाचाही विचार न करता तिने या प्रश्नाचे उत्तर दिले. ‘होय नक्कीच. जर मला ही गोष्ट योग्य वाटली तर मी असेच करेन. माझ्या मनाला असं वाटलं की, घरी राहून मी माझ्या कुटुंबाची, मुलाबाळांची काळजी घ्यावी; तर मी नक्कीच तसे करेन. बहुधा प्रत्येक स्त्रीने तिच्या मनाचा आवाज एकला पाहिजे’, असे कतरिना म्हणाली. लग्नाच्या नुसत्या नावानेच पळ काढणाऱ्याबाबत कतरिनाला प्रश्न विचारला असता ‘पुरुषच लग्नापासून पळ काढतात असंच काही नाही की, अशाही काही महिला आहेत ज्या त्यांच्या लग्नापेक्षा करिअरला जास्त प्राधान्य देतात. कुटुंब चालवण्यासाठी महिलांची भूमिका फार महत्त्वाची आहे, निदान माझे तरी असेच म्हणणे आहे’, असेही कतरिना म्हणाली.
कतरिनाच्या या वक्तव्यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूरने एका मुलाखती दरम्यान त्याच्या आणि कतरिनाच्या नात्यावर भाष्य केले होते. दरम्यान, कतरिना आणि सिद्धार्थच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘बार बार देखो’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.