तामिळनाडूतील शेतीच्या उत्सवादरम्यान खेळण्यात येणाऱ्या जलीकट्टू या पारंपारिक खेळावर सुप्रीम कोर्टाने २०१४ मध्ये बंदी घातली आहे. मात्र आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, ही बंदी हटवण्याची मागणी केली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली असताना, अभिनेता कमल हसननेही जलीकट्टूची बाजू घेत म्हटले की, ‘जर प्राणीप्रेमी जलीकट्टूमुळे इतके चिंतीत झाले असतील, तर त्यांनी बिर्याणीवरही बंदी आणावी.’

जलीकट्टू हा पारंपारिक खेळ आहे. मी स्वत: हा खेळ खेळलो आहे. मी अशा काही हातावर मोजता येतील अशा कलाकारांपैकी एक आहे जे दावा करतात की ज्यांनी बैलाला गळाभेट दिली आहे. मी खवळलेल्या बैलाशी झुंज दिली आहे. मी तमिळी आहे आणि मला हा खेळ आवडतो, असेही कमल हसनने नमूद केले.

कमल हसन यांचे याबद्दलचे मत अधिक महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण कमल हे या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. जलीकट्टू हा तामिळनाडूतील सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा पारंपारिक खेळ आहे. पीके कापणीच्यावेळी हा खेळ खेळला जातो. यामध्ये बैलाला चेतवून चिडवले जाते आणि त्यांना गर्दीत सोडून देतात. या खेळात भाग घेणाऱ्यांनी त्या बैलांची शिंगे पकडून त्याला शांत करायचे असते.

जलीकट्टूवर सुप्रीम कोर्टाने २०१४ साली बंदी घातली होती. या बंदीचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारी तामिळनाडू सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर २०१६ मध्ये फेटाळली होती.