काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातील मानाचा समजला जाणारा ७४ वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर मेरिल स्ट्रीप यांनी केलेल्या भाषणामधून अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांवर म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली होती. मेरिल यांच्या या भाषणामुळे अनेकांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. पण, मेरिल यांच्या या वक्तव्याला अनुसरुनच ज्यावेळी शाहरुख खानला विचारण्यात आले होते तेव्हा मात्र त्याने याविरोधातच सूर आळवल्याचे वृत्त बऱ्याच संकेतस्थळांनी प्रसिद्ध केले आहे.

मेरिल स्ट्रीप यांनी अगदी सहजपणे त्यांची भूमिका स्पष्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीचे मत मांडले होते. दरम्यान, हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुखला त्याच आधारे प्रश्न विचारण्यात आला की, ‘भारतीय कलाकार देशातील सद्यस्थितीवर मुक्तपणे का बोलत नाहीत?’ त्यावर ‘जर प्रसारमाध्यमांनी कोठेही माझे बोलणे जोडून- तोडून, त्यातील काहीही भाग न वगळता थेट माझ्या ठाम भूमिकाच इतरांपर्यंत पोहोचविल्या तरच मी असे मुक्तपणे बोलेन’, असे शाहरुख म्हणाला. ‘माझ्यासमोर एक असा/अशी पत्रकार आणा जे माझे म्हणणे त्यात कोणतीही फेरफार न करता जसेच्या तसे इतरांपर्यंत पोहोचवतील’, असे शाहरुख म्हणाला.

शाहरुखच्या या वक्तव्यामध्ये त्याने काहीसा नाराजीचा सूर आळवला होता. मेरिल स्ट्रीपच्या भाषणाविषयी बोलताना शाहरुख म्हणाला की, ‘जर का तुम्हाला मेरिल स्ट्रीप यांचे भाषण आवडले असेल तर ते ऐका. जर का तुमच्याकडे कोणत्याही विषयावर मुक्तपणे बोलणाऱ्या मेरिल स्ट्रीप असतील तर, तुम्हाला दुसऱ्या कोणाची काय गरज? इतर कोणाचीही नक्कल करण्याची तुम्हाला गरज का वाटते?, किती वेंधळेपणा आहे हा.. .’ मेरिल स्ट्रीप यांनी केलेले भाषण तुला योग्य वाटते का? असे जेव्हा शाहरुखला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘माझ्या मते त्यांनी योग्य तेच केले. सर्वांनीच असे असले पाहिजे. मी फक्त कलाकारांविषयीच बोलत नाहीये. कधीही काहीही घडले की अनेकांचाच असा प्रश्न असतो की याविषयी शाहरुख खान त्याची भूमिका स्पष्ट का करत नाहीये?’, असा सवाल करत शाहरुख म्हणाला की, ‘मला असे काही करायला आवडत नाही. कारण, मी एक कलाकार आहे; कोणी नेता नाही. त्यामुळे ‘त्या’ (मेरिल) जे काही म्हणाल्या ते योग्य आहे. योग्य त्या ठिकाणी आणि योग्य अशा प्रेक्षकांसमोर त्यांनी त्यांचे मत ठामपणे मांडले. भारतात प्रत्येक विषयांवर अनेकांच्या विविध भूमिका असतात’, असेही शाहरुखने स्पष्ट केले.

शाहरुख खान नेहमीच एखाद्या विषयावर केलेल्या वक्तव्यांसाठी आणि त्याच्या ठाम भूमिकांसाठी ओळखला जातो. प्रसारमाध्यमे आणि शाहरुखमध्ये असणारे नाते तसे सर्वज्ञातच आहे. त्यामुळे आता शाहरुखच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडिया आणि चित्रपटवर्तुळामध्ये कोणत्या चर्चा रंगतात ते लवकरच कळेल.