दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘सैराट’या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडित काढले आहेत. नवख्या कलाकारांसह नागराजने या चित्रपटामध्ये सर्वसामान्य पण तितक्याच वास्तवदर्शी कथानकाला हाताळले होते. या चित्रपटामधील सर्व महत्त्वाची पात्रंही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहेत. आर्ची, परश्या, सल्या, लंगड्या या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सैराट’च्या या प्रेक्षकवर्गामध्ये फक्त ठराविक वयोगटातील प्रेक्षकांचाच समावेश नसून अगदी तिसरी-चौथीतील चिमुरड्यांवरही या चित्रपटाने जादू केली.

सध्या सोशल मीडियावर असेच एक ‘सैराट’ उत्तर चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये तिसरीतील शालेय विद्यार्थ्याने एका प्रश्नाला अफलातून उत्तर लिहित अनेकांचे लक्ष वेधले आहे. ‘खालील चित्र पाहा आणि त्यावर आधारित गोष्ट लिहा’ असा प्रश्न विचारला असता दिलेल्या प्रश्नाच्या अनुशंगाने त्या विद्यार्थ्याने जे उत्तर निहिले आहे ते पाहता ‘सैराट’ चित्रपटाच्या लोकप्रियतेची आणि त्या विद्यार्थ्याच्या निरिक्षणाचीच सध्या चर्चा होत आहे.

‘सैराट’ चित्रपटामध्ये नागराज मंजुळेने हाताळलेल्या कथानकापेक्षा जरा हटके गोष्ट या विद्यार्थ्याने त्याच्या शब्दांत मांडली आहे. ‘तालुकास्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत आर्ची सहभागी होती….’ अशा वाक्याने या गोष्टीची सुरुवात झाली असून ‘त्या सपर्धेमध्ये आर्ची जिंकल्यावर परश्या, लंगड्या, सल्या, प्रिन्स सगळे आर्चीला घेऊन बिटरगावला गेले’ असा शेवट करत एक धम्माल गोष्ट या उत्तरामध्ये रचण्यात आली आहे. ‘सैराट’मध्ये प्रिन्सने म्हणजेच आर्चीच्या भावाने परश्या आणि आर्चीच्या प्रेमाला पाठिंबा दिला नसला तरीही या गोष्टीमध्ये मात्र तो आर्चीच्या बक्षीस जिंकण्याच्या आनंदामध्ये सहभागी झाला आहे.

‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच महिने उलटूनही या चित्रपटाची जादू अद्यापही कायम आहे असेच म्हणावे लागेल. ‘सैराट’ चित्रपटामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाला मिळालेले यश पाहता या चित्रपटातील सर्वच कलाकार प्रकाशझोतात आले होते.

9308b177-4dca-4a47-a8bb-69c20ee1bcba