अक्षय कुमार त्याच्या फिटनेसबाबत किती सजग आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याच्या सवयीला त्यानेच थोडे वेगळे वळण दिले. यावेळी त्याने चक्क कुत्र्यांसोबत बॉक्सिंग केली. विश्वास बसत नाही ना.. या ४९ वर्षीय अभिनेत्याने नुकताच चार कुत्र्यांसोबत बॉक्सिंग करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आजचे वर्कआऊटः या क्युट गुंडांसोबत थोडी बॉक्सिंग #पगलाईफठगलाईफ असे कॅप्शनही त्याने या ट्विटला दिले.

अक्षयचा दिनक्रम ठरलेला असतो. तो आपल्या या दिनक्रमात फारसा बदल करत नाही म्हणूनच तो आज अनेक तरुणांचा आवडता अभिनेता आहे. नुकतेच अक्षयने टॉयलेटः एक प्रेम कथा या सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण केले असून सध्या तो पॅडमॅन या सिनेमाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. पॅडमॅन सिनेमात अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘जॉली एल.एल.बी.२’ सिनेमाच्या यशानंतर अक्षय भविष्यात अधिकाधिक वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकांमध्ये दिसणार आहे. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ आणि आपल्या पत्नीच्या निर्मिती संस्थेखाली ‘पॅडमॅन’ या दोन चरित्रपटांमध्ये तो दिसणार आहे. या सिनेमांची चर्चा थांबतेय न थांबते तोच बुधवारी अक्षय कुमारने आपण अजून एका चरित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका करत असल्याचे जाहीर केले होते. ‘मोगल’ नावाने येणाऱ्या या सिनेमात अक्षय संगीताचा बादशाह म्हणून एकेकाळी ओळखल्या गेलेल्या गुलशन कुमार यांची भूमिका साकारणार आहे. एकाच वेळी दोन चरित्रपटांचे शिवधनुष्य अक्षयने हाती घेतले आहे. गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित ‘मोगल’चा फर्स्ट लुकही काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आला होता. ‘मोगल’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.