बॉलिवूड अभिनेता इंदर कुमारचे शुक्रवारी अंधेरी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. इंदर कुमारची पूर्वाश्रमीची प्रेयसी इशा कोप्पीकरला जेव्हा इंदरच्या निधनाचे कळले तेव्हा तिला मोठा धक्काच बसला. बॉम्बे टाइम्स डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत इशा फार भावूक झाली. ‘आम्ही गेली अनेक वर्षे एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. पण जे झालं अत्यंत वाईट आहे. तो खूप तरुण होता. त्याच्या पश्चात बायको आणि एक लहान मुलगी आहे. कोणाबाबतीतही असे घडू नये. मला त्याच्या कुटुंबियांसाठी फार वाईट वाटतं. खासकरुन त्याची बायको आणि भाऊ गोल्डी, जे त्याच्या पाठीशी नेहमीच उभे असायचे.’

‘स्पेशल फ्रेण्ड’सोबत विमानतळावर दिसली श्रुती हसन

‘तो कर्तव्यनिष्ठ, देखणा, अत्यंत हुशार माणूस होता. एक आघाडीचा अभिनेता होण्याचे सर्व गुण त्याच्याकडे होते. पण त्याच्या काही सवयींनी त्याचा घात केला. जर त्याने त्या सवयी दूर केल्या असत्या तर असे काही घडले नसते. आपण काहीही करण्याआधी आपले आई-वडील, भाऊ, यांचाही विचार केला पाहिजे. त्याच्या आयुष्यात नेहमीच चढ-उतार आले. पण तो खंबीरपणे उभा राहिला,’ असेही तिने मुलाखतीत सांगितले.

१९९६ च्या ‘मासूम’ सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉन्टेड’ या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेता सलमान खानच्या तर तो खूपच जवळचा असल्याने त्याने महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी अनेकदा सलमानचे सल्लेही घेतले आहेत. इंदर कुमारच्या पश्चात त्याची बायको व लहान मुलगी आहे.