सलीम-जावेद यांना पुरस्कार
१७ व्या ‘जियो मामि मुंबई चित्रपट महोत्सवा’त यंदा पहिल्यांदाच भारतीय चित्रपटांना प्राधान्य मिळणार आहे. भारतीय चित्रपट महोत्सवाच्या व्यासपीठावरून आंतरराष्ट्रीय चित्रपटांना आमंत्रित करताना इथल्या दिग्दर्शकांच्या वेगळ्या चित्रपटांना महोत्सवात पहिले स्थान असेल, असे आयोजकांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर या महोत्सवात पहिल्यांदाच ‘शोले’फेम लेखकद्वयी सलीम-जावेद यांना भारतीय चित्रपटातील सवरेत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची घोषणा ‘मामि’ची अध्यक्षा दिग्दर्शक किरण राव हिने केली आहे.
‘मामि’ चित्रपट महोत्सव बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच चित्रपट दिग्दर्शक किरण राव, चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा, अभिनेता फरहान अख्तर, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवने अशा मंडळींनी एकत्र येऊन या महोत्सवाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. गेल्यावर्षी थोडय़ा उशिराने ही मंडळी सहभागी झाली होती. मात्र, यावर्षीच्या महोत्सवासाठी लागणाऱ्या आर्थिक नियोजनापासून चित्रपटांच्या यादीपर्यंत सगळ्या गोष्टींची तयारी सहा महिने आधीपासून सुरू झाली होती. २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या ‘मामि’ महोत्सवात पहिल्यांदाच शुभारंभासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्याची प्रथा मोडून काढत पहिल्यांदाच ‘अलिगढ’ हा हंसल मेहता दिग्दर्शित हिंदी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. ‘मामि’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असला तरी तो इथल्या चित्रपटकर्मीनी सुरू केला असल्याने हिंदी आणि अन्य प्रादेशिक चित्रपटांना या महोत्सवात मुख्य स्थान देण्यात येणार आहे. महोत्सवासाठी २९ भाषांमधील २४८ चित्रपट निवडण्यात आले आहेत. त्यात यापूर्वी कधीही पाहायला मिळालेले नाहीत अशा ३१ भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.
१३ भारतीय चित्रपट या वेळी महोत्सवाच्या ‘इंडियन गोल्ड सेक्शन’अंतर्गत एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. तर महोत्सवासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय चित्रपटांमध्ये १४ चित्रपटांचे जागतिक प्रदर्शन, १७ चित्रपटांचे देशभरात प्रदर्शन इतक्या मोठय़ा प्रमाणात भारतीय चित्रपटांना प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी दिली.
महोत्सवात आंतरराष्ट्रीय सिनेमात सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चित्रपटकर्मीला पुरस्काराने गौरवण्यात येणार असून त्यासाठी इस्रायली दिग्दर्शक अ‍ॅमॉस गीताई यांची निवड करण्यात आली आहे. तर हिंदी चित्रपटसृष्टीत सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सलीम खान आणि जावेद अख्तर या लेखक जोडीला पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय, बालचित्रपटांसाठी ‘हाफ तिकीट’ या नावाने महोत्सवाची दारे खुली करण्यात आली असून जगभरातील सवरेत्कृ ष्ट बालपट या विभागात पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या कार्याला सलामी म्हणून त्यांचे चित्रपट आणि त्यांच्या कारकीर्दीचा आढावा या महोत्सवात घेण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी सांगितले. तर ३१ ऑक्टोबरला मेहबूब स्टुडिओत खास ‘मूव्ही मेला’चे आयोजन करण्यात येणार असल्याचे ‘डिस्ने इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ रॉय कपूर यांनी सांगितले.